मुंबई - इथोपियन विमान सेवेच्या कार्गो विमानाचे आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. तांत्रिक बिघाड झाल्याने या विमानाचे रविवारी सायंकाळी आपतकालीन लँडिंग करण्यात आले. ET-690 हे इथोपियन कार्गो हे विमान रियाध ते बंगळुरू असा प्रवास करत होते. त्यावेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचे आपतकालीन लँडिंग करण्यात आले.
विमानाचे हायड्रोलीक लिकेज-
रविवारी इथोपियन एअरलाईन्सचे कार्गो विमान रियाधवरून बंगळुरूला जात होते. त्यावेळी अचानक विमानाचे हायड्रोलीक लिकेज झाले. त्यामुळे पायलटने आपतकालीन परिस्थितीत मुंबई विमानतळावर उतरण्याची परवानगी घेतली. त्यानंतर तत्काळ विमानाला मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. विमानाची आपतकालीन लँडिंग होणार असल्याने मुंबई विमानतळ प्रशासनाने तत्काळ तीन फायर इंजिन, एक बचाव व्हॅन आणि इतर आवश्यक वाहने तैनात केली.
सुरक्षित लँडिंग -
मुंबई अग्निशमन दलाने पाठविलेली वाहने प्रोटोकॉलप्रमाणे घटनास्थळी दाखल झाली होती. त्यानंतर इथोपियन कार्गो 690, या विमानाचे मुंबई विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले. या विमानातील 8 क्रू मेबर्स सुखरुप असून कणालाही इजा झाली नसल्याची माहिती, मुंबई विमान प्राधिकरणाकडून देण्यात आली.