मुंबई - शहरात गुरुवारी रात्री गॅस गळतीच्या तक्रारी आल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत मुंबई अग्निशमन दल, पोलीस, एनडीआरएफ, गॅस व केमिकल कंपन्यांनी शोध घेतला असता कोणत्याही ठिकाणी गॅस गळती झाल्याचे निष्पन्न झाले नाही. यामुळे या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.
गॅस गळती प्रकरणी जी समिती स्थापन केली आहे. त्यात महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, पोलीस, एनडीआरएफ, आयआयटी, निरी, गॅस आणि केमिकल कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख अश्विनी जोशी यांनी दिली.
हेही वाचा - ओएनजीसी स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; अग्निशमन यंत्रणा अपुरी असल्याचा आरोप
पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मुंबईमधील गॅस गळतीबाबत आज एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख अश्विनी जोशी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीला मुंबई पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, एमडीआरएफ, केमिकल, गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना गुरुवारी रात्री पूर्व आणि पश्चिम उपनगरातून महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे ३४, मुंबई अग्निशमन दलाकडे २२, तर मुंबई पोलिसांकडे १०६ आणि गॅस कंपन्यांकडेही तक्रारी आल्या. या तक्रारी कुठून आल्या त्याची माहिती आज सर्व एजन्सीना देण्यात आली आहे. त्यानुसार पुढील ३ ते ४ दिवसात सर्व यंत्रणा तपासणी करणार आहेत.
वायू प्रदूषण तपासणी करण्याची यंत्रणा महापालिकेकडे आहे. त्यामधून 11 प्रकारच्या गॅसची तपासणी केली जाते. मात्र, या 11 प्रकारांमधील हा गॅस नव्हता. शहरात गॅसचे प्रमाण कोठेही वाढल्याचे दिसलेले नाही. यामुळे पाईपलाईनची गळती होते किंवा एखादे गॅस गळती होणारे वाहन या परिसरातून गेल्याने असा वास आला का, त्याचाही शोध घेतला जात आहे. अद्याप हा गॅस नेमका कुठून आला आणि तो कोणता गॅस होता याचा शोध लागलेला नाही. ज्या ठिकाणी गॅसचा वास आल्याच्या तक्रारी आल्या त्या ठिकाणी आमच्या टीमने शोध घेतला असता कोठेही गॅस गळती आढळलेली नाही. यामुळे या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती जोशी यांनी दिली. दरम्यान, असा कोणताही वास पुन्हा आल्यास पालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, मुंबई अग्निशमन दल तसेच मुंबई पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.
हेही वाचा - मुंबईतील गॅस कोंडीचा घरगुती पुरवठ्यावर परिणाम नाही, उद्यापर्यंत पूर्ववत होणार सीएनजी
पोलिसांकडूनही शोध -
गुरुवारी सायंकाळी साडे सात ते रात्री साडे दहा या दरम्यान घाटकोपर, चेंबूर, विलेपार्ले, मालाड आदी ठिकाणाहून 106 कॉल आले. कॉल आलेल्या त्या ठिकाणी आम्ही शोध घेतला. अग्निशमन दल, आपत्कालाईन व्यवस्थापन विभाग, आरसीएफ, महानगर गॅस, एनडीआरएफ यांच्याशी संपर्क साधून तपास करण्यात आला. एनडीआरएफ आणि मुंबई पोलिसांकडून पहाटे चार वाजेपर्यंत शोध सुरु होता. मात्र तो गॅस कोणता होता, हा गॅस कुठून आला हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. यामुळे आज बैठक झाली. समितीमधील सर्व केमिकल आणि गॅस कंपन्यांच्या सदस्यांना सर्व डेटा देऊन शोध घेतला जाणार आहे. पुढे असा पुन्हा काही वास आला तर आम्हाला संपर्क करा, आम्ही त्याची त्वरित दखल घेऊ, असे मुंबई पोलीस विभागातील उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले.