मुंबई - आरेतील मुंबई मेट्रो कारशेडवरची स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली. शिवसेना पक्ष प्रमुख, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत अखेर आता पुन्हा आरेमध्ये कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ( Environmentalists Activist In Mumbai ) तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याने कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. पण या कारशेडला पर्यावरण प्रेमींचा विरोध कायमच आहे.
आरेतच मेट्रो कारशेड होणार - आरेतच मेट्रो कारशेड होणार असे आता राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून आरे मेट्रो कारशेडबाबत स्पष्टीकरण दिल्यानंतर आणि कामावरील स्थगिती उठवल्यानंतर पर्यावरणवादी आक्रमक झाले आहेत. आज आरे वाचवा, मोहिमेसाठी मुंबईतील आरे परिसरातही आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी देशाच्या होणाऱ्या नवीन राष्ट्रपती, आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून, "आरे वाचवा, आदिवासींची घरे वाचवा," अशा पद्धतीचे बॅनर हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आले.
सर्व स्थगिती उठवल्याने तांत्रिक अडचणी दूर? - मुंबईत पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे आणि राजकीय कुरघोडीत अडकलेल्या आरे कारशेडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आरे कारशेडवरील स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली. पर्यावरणाच्या कारणामुळे ठाकरे सरकारने आरे कारशेडचे काम थांबवले होतं. त्यानंतर कांजूरमार्ग इथं कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मेट्रो कारशेडचा वाद न्यायालयात पोहोचला होता. पण महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार येताच आरेमध्ये पुन्हा कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील पर्यावरण प्रेमी संतापले - आता आरे कारशेडला घातलेली स्थगिती अधिकृतपणे उठवल्याने तांत्रिक अडचण दूर झाली आहे. त्यामुळे आरेमध्ये कारशेडचे बांधकाम पुन्हा सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबईतील पर्यावरण प्रेमी संतापले असून आज पुन्हा आरे वाचवण्यासाठी त्यांनी आंदोलन केले आहे.
आदिवासी पाड्यांवर संक्रात - आरे परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी पाडे असून सरकारच्या या निर्णयामुळे आदिवासी पाड्यांवरही संक्रात येणार आहे या कारणासाठी देशाच्या नवीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या उद्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हातात घेणार आहेत. ज्या आदिवासी समाजाच्या आहेत. त्या राष्ट्रपतींनाच आता या पर्यावरण प्रेमींनी आदिवासी बांधवांसाठी साद घातली आहे. आरे वाचवा, आदिवासींची घर वाचवा! अशा पद्धतीचे बॅनर याप्रसंगी झळकावत या पर्यावरण प्रेमींनी निदर्शन केली.
शिवसेनेचा सुरुवातीपासून विरोध - आरेतील वृक्षतोड आणि मेट्रोच्या कारशेडला शिवसेनेने पहिल्यापासून विरोध केला आहे. वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली होती. सत्तेत आल्यावर आरेला जंगल घोषीत करणारच, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी तत्कालीन भाजप सरकारला इशारा दिला होता. आरे मेट्रो कारशेडप्रकरणी हायकोर्टाने हिरवा कंदील दाखवत कारशेडसाठीच्या वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्याचा आदेश येताच फेटाळून लावल्याचा आदेश येताच रात्रीत आरे कॉलनीमध्ये वृक्षतोड करण्यात आली होती.
मेट्रो प्रशासनाविरोधात संताप व्यक्त - वृक्षतोडीला सुरुवात होताच पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध केला होता. तसंच या विरोधात नागरिकांनी आंदोलनंही केली होती. सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याआधीच झाडे तोडल्याने नागरिकांनी राज्य सरकार, मेट्रो प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला होता.
हेही वाचा - 50 बंडखोर आमदारांना मनसेत प्रवेश देणार का? राज ठाकरेंनी जाहीर केली भूमिका