मुंबई - मुंबईमध्ये गेल्या दीड ते दोन महिन्यात पुन्हा मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई शहरात रेल्वे एसटी बसने प्रवेश करताना, थिएटर, मॉलमध्ये प्रवेश करताना, खाऊ गल्ल्या, मार्केट, फेरीवाले, पर्यटन स्थळे तसेच सरकारी कार्यालयात प्रवेश करताना अँटीजेन कोरोना चाचणी करावी लागणार आहे. अँटीजेन कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच मुंबई शहरात, थिएटर, मॉल, कार्यालयात प्रवेश दिला जावा, असे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. तसे परिपत्रक महापालिकेने प्रसिद्ध केले आहे. मुंबईत दिवसाला गर्दीच्या ठिकाणी 47 हजार 800 अँटिजेन टेस्टचे टार्गेट महापालिकेने ठेवले आहे.
सर्वाधिक रुग्णांची नोंद -
मुंबईत गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. कोरोनाचा प्रसार झाल्याने लॉकडाऊन लावण्यात आला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर सर्व व्यवहार टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात आले. त्यामुळे गर्दी होऊन पुन्हा फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत आज गेल्या वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत गुरुवारी 18 मार्चला 2,877 तर शुक्रवारी 18 मार्चला 3,062 रुग्ण आढळून आले आहेत. याआधी मुंबईत गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला 2,848 तर 8 ऑक्टोबरला 2,823 रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हे ही वाचा - राज्यात शुक्रवारी 25 हजार 681 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
अँटिजेन टेस्ट नसल्यास नो इंट्री -
मुंबईत वर्षभरातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने पालिका प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. थिएटर, मॉल, खाऊ गल्ल्या, मार्केट, फेरीवाले आदींची अँटिजेन टेस्ट करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. तसेच मुंबईत येणाऱ्या इतर जिल्ह्यातून येणाऱ्या रेल्वे आणि एसटी बसमधून येणाऱ्या प्रवाशांच्याही अँटिजेंन टेस्ट करण्यात येणार आहेत. टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच मुंबई शहर, मॉल आणि थिएटरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल त्यांना घरी किंवा पालिकेच्या क्वारेंटाईन सेंटरमध्ये विलगिकरण करण्यातयेणार आहे.
47 हजार 800 अँटिजेंन टेस्टचे टार्गेट -
मुंबईमध्ये 27 मॉल असून त्यांना प्रत्येकी दिवसाला 400 प्रमाणे 10 हजार 800 अँटिजेंन टेस्ट कराव्या लागणार आहेत. मुंबईतील 9 रेल्वे स्थानकावर प्रत्येकी 1 हजार प्रमाणे 9 हजार टेस्ट केल्या जाणार आहेत. 4 एसटी डेपोमध्ये प्रत्येकी हजार प्रमाणे 4 हजार टेस्ट कराव्या लागणार आहेत. मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डमध्ये गर्दीच्या ठिकाणी प्रत्येकी 1 हजार याप्रमाणे 24 हजार चाचण्या केल्या जाणार आहेत. मुंबईत अशा एकूण 47 हजार 800 अँटिजेन टेस्ट करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.
हे ही वाचा - प्रियंका गांधींच्या आसाममध्ये होणार सहा सभा
या रेल्वे स्टेशनवर अँटिजेन टेस्ट -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर, बांद्रा, अंधेरी, बोरिवली, कुर्ला लोकमान्य टर्मिनस या ठिकाणी मुंबई बाहेरून मेल एक्स्प्रेस ट्रेन येतात. अशा या 9 रेल्वे स्थानकांवर प्रत्येकी 1 हजार प्रमाणे 9 हजार अँटिजेन टेस्ट केल्या जाणार आहेत.
..या एसटी डेपोमध्ये अँटिजेन टेस्ट -
मुंबईत एसटीच्या मार्गाने मुंबई सेंट्रल, परेल, बोरिवली आणि कुर्ला डेपोमध्ये प्रवासी येतात. या चारही एसटी डेपोमध्ये प्रत्येकी 1 हजार प्रमाणे 4 हजार अँटिजेन टेस्ट केल्या जाणार आहेत.