मुंबई - राज्यातील मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणासंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्याचा निकाल दिला. यामुळे राज्यात सुरू असलेल्या अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत बदल केले जाणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसरी प्रवेशाची यादी उद्या जाहीर केली जाणार होती. परंतु, या निकालामुळे ही प्रवेश यादी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आता उशीरा जाहीर होणार आहे. यासोबतच तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आदी अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले जाणार असल्याची माहिती उच्च शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये पदवी प्रवेशाची पहिली आणि दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली असली तरी अनेक महाविद्यालयात शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश कोणत्या पद्धतीने द्यायचे, या संदर्भात सुद्धा काही बदल होण्याची शक्यता विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्य कला संचालनालयाने नुकतेच आपल्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कला संचालनालयाच्या प्रवेशामध्येही बदल केले जातील, अशी माहितीही कला संचालनालयाकडून देण्यात आली आहे.
अकरावी सोबतच अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अंतर्गत येणाऱ्या आयटीआय आदी प्रवेशासाठी सुद्धा अनेक बदल केले जाणार आहेत. मात्र, शासनाकडून या प्रवेशासंदर्भात नवीन आदेश जारी केल्यानंतरच हे प्रवेश प्रक्रिया मार्गी लागतील, असेही शिक्षण विभागातील एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत राजकीय खलबते; कंगना संदर्भात सावध भूमिका घेण्याची पवारांची सूचना