मुंबई/ठाणे - बोरिवली पूर्व कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी झालेल्या गोळीबारप्रकरणी मीरा भाईंदर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हे सर्व छोटा राजन टोळीशी संबंधित गुन्हेगार असल्याचे समोर येत आहे. आरोपींना उत्तर प्रदेशातील भदोही आणि ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. अभियंत्यावर गोळीबार करण्याचे मुख्य कारण म्हणजे निविदेबाबत मनमानीचे प्रकरण समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास कस्तुरबा पोलीस करणार आहेत.
आरोपी छोटा राजन टोळीतील -
गेल्या आठवड्यात बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानासमोर सर्व्हिस रोड श्री कृष्णा कॉम्प्लेक्स समोर पीडब्ल्यूडी अभियंता दीपक खांबित (45) यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात मीरा भाईंदर गुन्हे शाखेने मुख्य आरोपी अमित सिन्हा (40) ला अटक केली. उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यातून त्याला अटक केली. अमित सिन्हा छोटा राजन टोळीसाठी काम करतो. 2010 मध्ये अमित डी.के. रावसाठी काम करायचा. आणखी एक साथीदार बाबू खान याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. या टोळीचे सर्व सदस्य ठाकूर टोळीशी संबंधित आहेत आणि डी कंपनीसाठी काम करत होते. ठाकूरने टोळीच्या सांगण्यावरून अभियंत्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर अमित उत्तर प्रदेशात पळून गेला होता.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, PWD अभियंता दीपक खांबित हे भाईंदर महानगरपालिकेतून बाहेर पडणाऱ्या निविदेबाबत स्वतःची मनमानी करत असत. त्यामुळे पालघरची ठाकूर टोळी खूप संतापली होती. याचा बदला घेण्यासाठी अभियंत्याला ठार मारण्याचे कंत्राट देण्यात आले होते. भाईंदर नगरपालिका कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन दुचाकीस्वार पांढऱ्या पावसाच्या कोटात अभियंत्याची वाट पाहताना दिसले. जेव्हा त्याला संधी मिळाली नाही, तेव्हा अभियंत्याचा पाठलाग करत त्यांनी कस्तुरबाच्या हद्दीत त्यांच्यावर गोळीबार करून पळ काढला होता.
हे ही वाचा -Cruise Drug Case : एनसीबी कारवाईपूर्वीचे क्रुझ ड्रग्स पार्टीचे व्हायरल व्हिडिओ
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अभियंत्यावर केला होता गोळीबार -
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्यावर दिवसा ढवळ्या गोळीबार करून पसार झालेले आरोपी अद्यापही बेपत्ता असल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी मीरा भाईंदर गुन्हे शाखेकडून एका आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त महेश पाटील यांनी दिली आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावर दीपक खांबित हे कार्यरत आहेत. २९ सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी ६.१० वाजता ते कामावरून घरी परतत असताना बोरिवली येथील संजय गांधी उद्यानाजवळ दोन दुचारीस्वार युवकांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. यात खांबित हे थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली. मात्र हल्ला करून हल्लेखोर फरार झाल्याने मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालय आणि बोरिवली पोलिस विभाग तात्काळ तपास कार्यास सुरुवात केली. यात पोलीस विभागाकडून अनेक संशयित लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात आतापर्यंत 'अमित सिन्हा' या आरोपीला अटक करण्यात आली असून कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असल्याची माहिती मीरा भाईंदर गुन्हे शाखेचे उपायुक्त महेश पाटील यांनी दिली.