मुंबई - मुंबईतील चार मेट्रो मार्गांचे कारशेड एकाच ठिकाणी कांजूरमार्ग येथे उभारण्यात येणार असून आता हा परिसर 'मेट्रो हब' म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळे आता या परिसरातील जागेला सोन्याचा भाव येणार असल्याची शक्यता लक्षात घेत अनेकांचा डोळा आता या जागेवर पडला आहे. त्यातुनच गेल्या 15 दिवसांत कांजूरमार्गवरील मिठागराच्या अंदाजे 10 एकर जागेवर अतिक्रमण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर या प्रकरणी वनशक्ती संघटनेने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
हेही वाचा -मंत्र्यांच्या बंगल्यांवर सरकारची उधळपट्टी; विरोधक म्हणतात सरकारला भान नाही
या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती स्टॅलिन दयानंद, प्रकल्प संचालक, वनशक्ती यांनी दिली आहे. तर ही जागा लाटण्याचा मोठा डाव असल्याचे म्हणत मुंबई महानगरपालिकेच्या वन विभागाने ही जागा संरक्षित करावी अशी मागणी केली आहे.
कांजूरमार्ग होणार 'मेट्रो हब'
मेट्रो 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) चे कारशेड पूर्व द्रुतगती मार्गालगतच्या कांजूर मार्ग येथील एका मोकळ्या जागेवर बांधण्यात येणार आहे. तर आता याच जागेवर मेट्रो 3, 4 आणि 14 चे ही कारशेड बांधण्यात येणार आहे. मेट्रो 6 च्या कारशेडला दोन वर्षापूर्वीच मंजुरी देण्यात आली. तर मेट्रो 3, 4 आणि 14 चे कारशेड येथेच बांधण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता चार मेट्रो मार्गाचे कारशेड एकाच ठिकाणी असणार आहेत. ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण एकार्थाने आता हा परिसर 'मेट्रो हब' ठरणार आहे. त्यामुळे या परिसराला भविष्यात खूप महत्व प्राप्त होणार आहे. तर येथील जागेलाही महत्व येऊन जागेला सोन्याचा भाव येण्याची शक्यता आहे.
कांजूरची जागा अचानक वादात
मेट्रो 6 च्या कारशेडसाठी ही जागा दोन वर्षांपूर्वीच देण्यात आली आहे. फडणवीस सरकारने याला मंजुरी दिली होती. पण आता जेव्हा याच जागेवर मेट्रो 3 चे कारशेड हलवल्यास भाजपा कडून याला विरोध होत आहे. ही जागा कशी योग्य नाही हे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या जागेवर कारशेड बांधण्यास विरोध केला जात आहे. यावरून राज्य सरकार आणि विरोधी पक्षात वाद सुरू असतानाच यात केंद्र सरकारने ही उडी घेतली आहे. ही जागा आपल्या मालकीची असल्याचे म्हणत केंद्राने एमएमआरडीएला काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. पण या आदेशानंतरही काम सुरूच असल्याने केंद्राने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर सुनावणी सुरू आहे. एकूणच यावरून चांगलाच वाद रंगला आहे.
याच वादग्रस्त जागेजवळ अतिक्रमण
कांजूरमार्ग येथे मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे. ही जागा तिवरांनी व्यापलेली, मिठागराची आहे. यातील काही जागेवर कारशेड बांधण्यात येणार असून अंदाजे 50 एकर जागा मोकळी आहे. द्रुतगती मार्गालगत ही जागा आहे. तर आता त्यात ही जागा मेट्रो हब म्हणून ओळख निर्माण करणार आहे. मुंबईत जागेला सोन्याचा भाव असताना ज्या ठिकाणी एखादा मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प उभा राहतो तेव्हा त्याला लगतच्या जागेला आणखी भाव येतो. अशावेळी कांजूरला इतकी मोठी जागा असताना या जागेचा वाद सुरु असताना म्हणताच काहीनी याचा फायदा घेत येथे अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणासाठीचे सामान आल्याची माहिती पर्यावरण प्रेमींना मिळाली. त्यानुसार स्टॅलिन यांनी याठिकाणी धाव घेतली असता किमान 10 एकर जागेवर रिबीन लावून जागेची वाटणी अर्थात प्लॉटिंग करण्यात आल्याचे दिसून आले. तर मोठ्या संख्येने लोकं येथे अतिक्रमण करण्यासाठी येत असल्याचे ही स्पष्ट झाले. त्यामुळे स्टॅलिन यांनी तात्काळ या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पालिका, जिल्हाधिकारी आणि वन विभागाला पत्र पाठवत हे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे.
वन विभागाने ही जागा ताब्यात घेत संरक्षित करावी
याप्रकरणी पोलिसांनी आपल्या तक्रारीनंतर अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल आहे. तर सद्या वन विभागाने अतिक्रमण करणाऱ्यांना हुसकावून लावले आहे. पण अतिक्रमण वारंवार होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा ही जागा वनविभागाने ताब्यात घेत ती संरक्षित करावी अशी मागणी स्टॅलिन यांनी केली आहे. तेव्हा आता पालिका, वनविभाग आणि जिल्हाधिकारी नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - प्रताप सरनाईकांनी कंगना रणौत आणि माध्यमांवर दाखल केला हक्कभंग प्रस्ताव..