मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देश लॉकडाऊन झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि कर्मचाऱ्यांंसाठी राज्य सरकारच्यावतीने बेस्ट, राज्य परिवहन, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेचा उपयोग केला जात आहे.
यातून मुख्य म्हणजे सरकारला अपेक्षित असलेले ते सोशल डिस्टन्सच्या तत्वाचे उल्लंघन होत असल्याचे सर्रास दिसून येत आहे. जीवावर उदार होऊन अत्यावश्यक सेवा देण्याबरोबरच आपली नोकरी वाचवण्यासाठी कर्मचारी जिवाचे रान करत असताना नियोजन नसलेल्या परिवहन व्यवस्थेमुळे अनेकांची कुचंबना होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेकदा कामाच्या ठिकाणी जाण्यास उशीर होतो त्याशिवाय अत्यावश्यक सेवा देण्यामध्येही अप्रत्यक्षपणे कुत्र होत असल्याचे एका कर्मचाऱ्याने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवा नसलेले लोक या परिवहन सेवांमध्ये अतिक्रमण करण्यात असल्याचेही दिसून आले आहे. मुंबई उपनगर आणि ठाणे रायगड जिल्ह्यातून येणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना मात्र सेवा देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.