मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रासह राज्यात पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर या ठिकाणी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असून या प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. पहिल्या दिवसापासूनच या संकेतस्थळामध्ये अनेक त्रुटी असल्याने ते नीट चालत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सोसावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.
संकेतस्थळ सुरू होऊन एक आठवड्याहून अधिक कालावधी झाल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या संदर्भातील माहिती पुस्तिका आज घाईघाईने अपलोड केली आहे. मात्र या प्रवेशाचे नेमके वेळापत्रक काय असेल या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत. अकरावी ऑनलाईनसाठी मागील तीन दिवसांपासून प्रवेशासाठीच्या पहिल्या टप्प्याची माहिती भरणे सुरू आहे. मात्र त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. आज दिवसभरातही संकेतस्थळाच्या त्रुटीमुळे विद्यार्थ्यांना फटका बसला असल्याचे सांगण्यात आले.
शालेय शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी यंदा तलिष्का नावाच्या एका नवीन कंपनीसोबत करार केल्याने यासाठीच्या अडचणी वाढल्या असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. अकरावी प्रवेशासाठी मागील तीन वर्षापर्यंत नोएडा येथील नायस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियाचे कंत्राट देण्यात आले होते. ते यंदा अचानकपणे रद्द करण्यात आले आहे. तर ज्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे त्या कंपनीकडे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया त्यासंदर्भातील दांडगा अनुभव नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे वरिष्ठ अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले. शिक्षण विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे यंदा अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया हे वादाच्या भोवर्यात सापडली जाईल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
यंदाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठीचे सर्व सूत्रे पुण्यातील संचालक कार्यालयातून चालवले जात असल्याने मुंबई सह नाशिक औरंगाबाद, नागपूर आदी ठिकाणी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियासाठी विद्यार्थ्यांकडून किती प्रतिसाद मिळतो याची माहिती सुद्धा या विभागीय उपसंचालक कार्यालयाला मिळत नसल्याने, याविषयी अधिकारीही या संपूर्ण प्रक्रियेवर नाराज असल्याचे सांगण्यात येते.
मुंबई महानगर क्षेत्रात यंदा अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी असलेल्या 830 कनिष्ठ महाविद्यालयात एकूण तीन लाख 20 हजार 120 जागा उपलब्ध आहेत. यात सर्वाधिक जागा या वाणिज्य शाखेच्या असून त्याखालोखाल विज्ञान आणि सर्वात कमी जागा या कला शाखेच्या आहेत. या सर्व जागांवर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असली तरी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळात अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याने त्याचा नाहक त्रास सोसावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.