मुंबई - "एलिफंटा महोत्सव २०१९" "स्वरंग'चा दिमाखदार उद्घाटन सोहळा गेट वे ऑफ इंडिया येथे शनिवारी पार पडला. यावेळी एलिफंटा महोत्सवाच्या तारखांच्या अनेकवेळा अडचणी येतात, त्या यायला नकोत. कार्यक्रम ठरल्यावेळीच व्हायला हवा, असे सांगत पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी पर्यटन विभागाचे कान टोचले.
भाजप सरकारने एलिफंटा बेटावर ७० वर्षांनंतर वीज पोहचवून अंधार दूर केला. कोळी-आगरी संस्कृती सांभाळून या बेटाचा विकास सुरू असल्याचेही रावल यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जपान कौन्सिलेट जनरल मीचीयो ह्यारादासान यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुंबई ही मायानगरी म्हणून प्रसिद्ध आहे. हे शहर रात्रीही धावत असते. त्यामुळे पर्यटकांना त्याचे आकर्षण आहे. अशा या मुंबईत पर्यटकांचे पर्यटन महामंडळ स्वागत करत असते. पर्यटन विभागाकडून मुंबईपासून जवळच पर्यटकांसाठी क्रूझ टुरिझम सुरू केले आहे. नागपूरमध्ये संत्रा महोत्सव, कोकणात कोकण महोत्सव, तर मुंबईत मुंबई मेला या सारखे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याची माहिती रावल यांनी दिली.
उद्घाटन कार्यक्रमात भारतीय पारंपारिक आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय पार्श्वगायक कैलास खेर यांनी शिवाची आणि पावसाची आराधना केली. तसेच आपल्या गाण्यांनी महोत्सवाला आलेल्या पर्यटकांचे मनोरंजन केले.
एलिफंटा बेटावर रविवारी होणारे कार्यक्रम
एलिफंटा बेटावर साठे कॉलेजचे पुरातत्व भारतीय संस्कृतीचे विभाग प्रमुख डॉ. सूरज पंडीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे हेरिटेज वॉक या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच पार्श्वगायक राहुल देशपांडे, स्वप्निल बांदोडकर, गायिका प्रियंका बर्वे यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, सुलेखनकार अच्युत पालव, व्यंगचित्रकार निलेश जाधव आणि शिलकुंभार यांचे चित्र, शिल्प, शब्द आणि सुलेखनाचा संगम सोहळ्याचा आस्वाद पर्यटकांना घेता येणार आहे.