मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांच्या दालनात पदभार ( CM Eknath Shinde Takes Charge ) स्वीकारला. शिंदे आज पदभार स्वीकारणार असल्याने मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाची सजावट करण्यात आली आहे. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
मंत्रालयात प्रवेश केल्यानंतर प्रथम मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रालयातील महापुरुषांच्या फोटोला अभिवादन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक बंडखोर आमदार उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री दालनाकडे जात असताना अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. एकनाथ शिंदेंनी पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. पदभार घेतल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून आपला एक वेगळा गट निर्माण केला होता. नंतर या गटाने भाजपसोबत जाऊन राज्यात सरकार स्थापन झाली. शिंदे आणि भाजप सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असून, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारली आहे. शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेनेत प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेतील आमदार तर फुटलेच आता खासदार देखील पक्ष सोडतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गळतीमुळे शिवसेना कमी कमी होत असून माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते उद्धव ठाकरेंकडून तिच्या पुनर्बांधणीचे प्रयत्न होत आहे.
हेही वाचा : CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचे बोरिवलीत शक्तीप्रदर्शन