नवी मुंबई - तुर्भे एसटी डेपोच्या गेट वर सेक्टर 20 येथे आनंदा बाबूराव सुकाळे (55) यांचा अज्ञात व्यक्तीने खून केला होता. या घटनेला ८ वर्ष पुर्ण झाली आहेत. मात्र त्यांचा खुनी सापडत नव्हता. अखेर पोलिसांना आठ वर्षानंतर त्यांचा खुनी सापडला आहे. दशरथ कांबळे असे आरोपीचे नाव असून तो आनंदा यांचा परिचयाचा होता.
गुन्हेगाराला घेतले ताब्यात
हा खुन २०१२ मध्ये झाला. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे 2013 ला या गुन्ह्यांचा तात्पुरता तपास बंद करण्यात आला. मात्र गुन्हे शाखा परिमंडळ 2 चे पोलीस नाईक रुपेश पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, हद्दपार गुन्हेगार दशरथ विठ्ठल कांबळे (46) याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने आनंदा बाबुराव सुकाळे यांचा खून केल्याची कबुली दिली.
...म्हणून केला होता खुन
मृत माथाडी कामगार आंनदा सुकाळे आणि आरोपी दशरथ कांबळे हे दोघे परिचयाचे होते. आनंदा सुकाळे याने जुगारात 25 हजार रुपयांची रक्कम जिंकली होती. ती रक्कम चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपी कांबळे याने 28 डिसेंबर 2012 ला दुपारी अडीच वाजता साई पार्किंग धर्मवीर संभाजी नगर सेक्टर 20 येथे सुकाळे यांच्यावर हल्ला केला. बोथट वस्तूने वार करून नायलॉनच्या दोरीने सुकाळे यांचा गळा आवळला होता.
आठ वर्षांनी झाला उलगडा
आनंदा सुकाळे हे माथाडी कामगार असल्यामुळे व हत्या एपीएमसी परिसरात झाल्यामुळे प्रक्षोभक वातावरण तयार झाले होते. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्याचा तब्बल आठ वर्षाने पनवेल गुन्हे शाखा परिमंडळ दोनच्या माध्यमातून उलगडा झाला आहे. आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. संबधित आरोपी हा हद्दपार असून त्याच्यावर चोरी, घरफोडी, मारहाण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या आठ वर्षांपासून तो पोलिसांची दिशाभूल करत होता.
हेही वाचा- जिंतूर : विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
हेही वाचा- अट्टल दुचाकी चोरटा एलसीबीच्या जाळ्यात; चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत