मुंबई - आम्ही देशातील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली आहे. त्यामुळेच नागरिकांनी आम्हाला भरभरून मते दिली. राज्यातही सरकारचे काम चांगले असल्याने आम्हाला यश मिळाल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत दिली. मुंबईतील सहाही लोकसभा मतदार संघात भाजप आणि सेनेच्या उमेदवारांचा विजय झाला. त्यानंतर त्यांनी गोरेगाव येथील नेल्को येथे मतदान केंद्रासमोर येऊन माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
मोदी विकास करतात, मोदी सुरक्षेच्या विषयी चांगले निर्णय घेतात. जगामध्ये भारताचे नाव उज्वल करतात, गरिबांना घर देतात. त्यामुळे देशातील मतदारांनी हे उत्तर दिले आहे. जे मोदींचा विरोध करत होते, त्यांनाही चपराक आहे. ज्या मोदींच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन नेत्यांनी केले होते, त्या कलाकारांना मी सांगतो, की काँग्रेसच्या काळात विरोध करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या काळात एकही असी घटना दाखवा असेही त्यांनी सांगितले. गोपाळ शेट्टीला हरवण्यासाठी एका कलाकाराला समोर उतरवले होते. तरीही जनतेने गोपाळ शेट्टीवर विश्वास ठेवला. मुंबईच्या सहा जागा आम्ही जिंकल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणचा पराजय झाला, पार्थ पवार पडले. यामुळे राज्यात आता महाराष्ट्राचा विकास भाजप-सेना युती करणार, हा संदेश जनतेने दिल्याचेही तावडे म्हणाले.
आम्हाला मुंबईत सहा जागा मिळाल्या, विरोधाला विरोध करणाऱ्यांना ही मोठी चपराक असल्याची टीकाही त्यांनी केली.
राज ठाकरे यांच्या भाषणामुळे राज्यातील जनतेची करमणूक झाली. त्यांच्यामुळेच आम्हाला लोकांनी अधिक बाहेर येऊन मतदान केले. मात्र करमणुकीसाठी ठाकरे यांनी राज्यात करमणूक कर भरला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.