मुंबई - 100 कोटी वसुली प्रकरणी ईडीने आज तपासाचा अनिल देशमुख यांच्या भोवती धडाका लावला होता. अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत ईडीने सर्च ऑपरेशन केले. ईडीच्या कारवाईला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे देशमुख म्हणाले. त्यांनी तात्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरही निशाणा साधला.
अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत सर्च ऑपरेशन
आज दिवसभर प्रसारमाध्यम अनिल देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर कॅमेरे लावून बसले होते. अगदी सकाळीच ईडीचे एक पथक अनिल देशमुख यांच्या घरी छापेमारी करण्यासाठी पोहोचले. बातमी वाऱ्यासारखी पसरली. ईडीचे पथक देशमुख यांच्या नागपूर इथल्या घरीदेखील पोहोचले होते. मात्र अनिल देशमुख त्यांच्या वरळी इथल्या निवासस्थानी होते. अनिल देशमुख यांच्या वरळीतल्या सुखदा सोसायटीतल्या घरामध्ये तब्बल साडे अकरा तास ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरु होते. दरम्यान या सर्च ऑपरेशन वेळी स्वतः अनिल देशमुख घरी उपस्थित होते.
काय म्हणाले अनिल देशमुख?
ईडीकडून तब्बल साडेअकरा तास छापेमारी झाल्यानंतर ईडीची टीम देशमुख यांच्या घरातून रवाना झाली. त्यानंतर देशमुख स्वतः प्रसार माध्यमांच्या समोर आले आणि आपली प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख म्हणाले की, 'या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे, तसेच ईडी देखील करत आहे. ईडीचे अधिकारी आज चौकशीसाठी आले होते. त्यांना मी पूर्ण सहकार्य केले आहे. पुढील काळात देखील असेच सहकार्य करू असे देशमुख म्हणाले.' त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर देखील निशाणा साधला. तात्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जे माझ्यावर खोटे आरोप केले होते, ते त्यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर केले. ते पोलीस आयुक्त असताना माझ्यावर आरोप केले नाहीत. त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आम्ही त्यांना आयुक्तपदावरून हटवले, असेही ते म्हणाले.
ईडीची कारवाई
ईडीकडून अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. तसेच ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी देखील ईडीचे एक पथक पोहोचले होते. वरळीतल्या सुखदा सोसायटीत तब्बल साडेअकरा तास अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत सर्च ऑपरेशन करण्यात आले. यावेळी अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.
हेही वाचा - केंद्रीय यंत्रणांचा दडपशाहीसाठी वापर, मात्र आम्ही चिंता करत नाही- शरद पवार