मुंबई - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी अनिल देशमुख यांचे वकील सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. समन्स प्राप्त झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी सकाळी वकिलांमार्फत ईडीला पत्र पाठवलं. अनिल देशमुख यांनी एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. ईडीने आणखी वेळ दिल्यास आज ते चौकशीसाठी हजर राहणार नाहीत, असे वकिलांनी सांगितले. काल दिवसभर सक्तवसुली संचलनालय (ईडी) कडून त्यांच्या नागपूर व मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, आज ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आले होते. ईडीने अनिल देशमुख यांना शनिवारी सकाळी 11 वाजता कार्यालयात हजर होण्यास सांगितले होते.
अनिल देशमुख यांना ईडी इकडून 29 जून रोजी हजर राहण्याचे समन्स
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीइकडून 29 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स देण्यात आलेले आहे. आज ते ईडीपुढे हजर झाले नाहीत. त्यांनी वकिलामार्फत आपले म्हणणे मांडले होते. तसेच हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता.
अनिल देशमुख यांच्या वकिलांनी ईडीला पत्र सोपवले असून आरोपासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. आम्ही ईडीला पत्र सोपवले असून चौकशीसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. कारण, ईडीने आरोपासंदर्भातील कोणतीच कागदपत्रे पाठवली नाहीत. त्यामुळे अनिल देशमुख चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाहीत. आम्ही आमचे काम पार पडले असून ईडीने आता भूमिका घ्यावी, असे अनिल देशमुख यांचे वकील अॅड जयवंत पाटील यांनी सांगितले.
100 कोटी रुपये वसूल प्रकरणात ईडीकडून तपास केला जात असताना, मुंबईतील काही बार मालकांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान मुंबईतील 10 बार मालकांनी अनिल देशमुख यांना प्रत्येकी 4 कोटी रुपये दिले असल्याची कबुली दिल्याचा दावा ईडीने केला आहे. शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर व इतर ठिकाणी छापेमारी केली होती. यानंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहायकास (पीए) संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर ईडीकडून देशमुख यांना समन्स पाठवले होते. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती.
नऊ तास चालली अनिल देशमुखांची चौकशी -
100 कोटी वसुली प्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांच्या भोवती तपासाचा धडाका लावला आहे. शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी ईडीतर्फे छापेमारी करण्यात आली. सकाळी 8 वाजेच्या सुमारास ईडीचे पथक देशमुखांच्या घरी दाखल झाले होते. ही चौकशी सुमारे नऊ तास चालली. या पथकामध्ये एक महिला अधिकाऱ्यासह पाच जणांचा समावेश होता. दिवसभर चाललेल्या चौकशीत अनिल देशमुख यांची पत्नी, मुलगा सलील आणि त्यांची सून या सर्वांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस केली. यावेळी ईडीच्या कारवाईला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे देशमुख यांनी म्हटलं होतं. शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या वरळीतल्या सुखदा सोसायटीतल्या घरामध्ये तब्बल साडे अकरा तास ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरु होते. दरम्यान या सर्च ऑपरेशन वेळी स्वतः अनिल देशमुख घरी उपस्थित होते.
बारमालकांची कबुली -
अनिल देशमुख यांच्या घरी तपास सुरू असताना दुसरीकडे ईडीकडून मुंबईतील काही बार मालकांची चौकशी करण्यात आली. मुंबई पोलीस खात्यातील गुन्हे शाखेचा बडतर्फ अधिकारी सचिन वाझेला मुंबईतील 1 हजार 700 हून अधिक बार मालकांकडून 100 कोटी रुपये प्रति महिना वसूल करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. याप्रकरणात ईडीच्या चौकशीमध्ये मुंबईतील जवळपास 10 बार मालकांना बोलावण्यात आले. यावेळी बारमालकांनी 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिल्याचे ईडीने म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांच्यावरील आरोप -
मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया कार स्फोटक प्रकरण या दोन्ही प्रकरणानंतर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली. बदलीच्या नाराजीमुळे परमबीर सिंह यांनी एक पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. या पत्रात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या पत्रात अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार, पब आणि रेस्टॉरंटमधून शंभर कोटी रुपयाच्या वसूलीचे टार्गेट दिले असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका मुंबई हायकोर्टाकडे पाठवली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, असे निर्देश दिले होते.
हेही वाचा - 'या' आरोपांच्या पुराव्यांसाठी देशमुखांच्या घरावर ईडीचे छापे...
हेही वाचा - ...अन् तब्बल नऊ तास चालली अनिल देशमुखांची चौकशी