ठाणे - राज्यसभा निवडणुकीची मतदानाची परवानगी मिळावी याकरिता अनिल देशमुख, नवाब मलिक यांनी केलेल्या अर्जाला ईडीने विरोध केला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारची चिंता अधिक वाढली आहे. उद्या (बुधवार) मुंबई सत्र न्यायालयातील PMLA न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदान परवानगीला ईडीचा विरोध - अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदान करण्याकरिता मागितलेल्या परवानगीवर ईडीकडून उत्तर दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याकडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात 4 जून रोजी अर्ज केला होता. ज्यावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, ईडीने विरोध दर्शविल्यामुळे ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे.
विधानसभेतील आमदारांचे संख्याबळ आणि राज्यसभेच्या विजयाचा कोटा या दोन्हीचा ताळमेळ बसून सहाव्या जागेवरील उमेदवार विजयी होण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनाही अपक्ष आमदारांची मदत लागणार आहे. त्यामुळे आता घोडेबाजार होणार हे स्पष्ट आहे. विधानसभेत 13 अपक्ष आमदार तर छोट्या पक्षांचे 16 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 53 आमदार असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. त्यांना मतदानासाठी परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादीने न्यायालयात अर्ज केला आहे.
विधानसभेत शिवसेनेचे 56 आमदार होते. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाल्याने शिवसेनेच्या आमदारांची संख्या 54 वर आली आहे. विधानसभेत काँग्रेसचे 44 आमदार आहेत. या निवडणुकीत अपक्ष आमदारांचे महत्व वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थनाचे अपक्ष आमदार आणि महाविकास आघाडीतील सर्व आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
महाविकास आघाडीची चिंता वाढली - दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अधिक चुरशीचे मतदान होणार आहे. हे स्पष्ट झाले आहे. भाजप आणि शिवसेना आमने-सामने असल्याने सहाव्या जागेसाठी मैदान कोण मारणार? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीसाठी एक-एक मताला महत्त्व आले आहे. भाजप आणि महाविकासआघाडी यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपला दोन जागा मिळणं निश्चित आहे. पण भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीच्या चिंता वाढल्या आहेत.