नागपूर - वकील सतीश उके आणि त्यांचे मोठे भाऊ प्रदीप उके चौकशी केल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. नागपूरच्या सेमिनार हिल परिसरातील सिजिओ कॉम्प्लेक्स मधील ईडी कार्यालयातही 12 तास कसून चौकशी करण्यात आली. सकाळी आठ वाजता दोघांनाही मुंबई ईडीच्या पथकाने विमानाने मुंबईला आणण्यात आले. पुढील चौकशी मुंबईच्या कार्यालयात होणार आहे. मात्र त्याआधी सतीश आणि प्रदीप उके यांची जेजे रूग्णालयात मेडिकल तपासणीनंतर मुंबईच्या PMLA न्यायालयात हजर करावे लागणार आहे. ईडी कडून दोघांची कस्टडी मागितली जाणार आहे.
पीएमएलए कोर्टासमोर हजर करणार - ईडीने सतिष उके यांना आज सकाळी 8 वाजता वरळी येथील कार्यालयात आणले आहे. आज त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळते की कोठडी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सतिश उके यांना 11 वाजताच्या सुमारास मेडिकल चेकअप करण्याकरिता जे.जे रुग्णालयात नेण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
ईडी नियमबाह्य काम करतेय - सतिष उके यांचे वकील वरळी येथील कार्यालयात सतिष उके यांची भेट घेण्याकरिता गेले होते. मात्र ईडीच्य अधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्याची परवानगी नाकारली. तसेच वकालतनामावर सही देखील घेऊ दिली नाही, असा आरोप उके यांच्या वकिलांनी केला आहे. वकिलांनी सांगितले की ईडी कायद्याचे पालन करत नाही आहे. सतिष उके यांच्या भावाला देखील ईडीने मुंबईला का आणले, यासंदर्भात आम्ही न्यायालयासमोर ईडीला विचारणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणा असो की राज्याची तपास यंत्रणा कोणत्याही यंत्रणेला नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, ते म्हणाले.
काल पहाटे घरावर टाकला छापा- वकील सतिश उके यांच्या नागपुरातील निवासस्थानी काल पहाटे अमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या पथकाने छापा टाकला. ईडीने दोघांची पाच तास चौकशी केली. त्यानंतर त्याचा भाऊ प्रदीप आणि त्यांना ताब्यात घेऊन नागपूर ईडी कार्यालयात नेण्यात आलं.. पथकाने सतीश उके यांचा मोबाईल आणि लॅपटॉप सुद्धा जप्त केला आहे. ईडीने छापा टाकताच सीआरपीएफच्या जवानांचा बंदोबस्त उकेच्या घराबाहेर तैनात करण्यात आला होता. घरी केलेल्या पाच तासांच्या चौकशीनंतर भावासह ताब्यात घेतलं होतं.
जमीन व्यवहारातुन ईडीचा छापा -वकील सतीश उके यांनी गैरमार्गाने काही जमिनी बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यासंदर्भात अजनी पोलीस ठाण्यात सतीश उके विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल आहे. याआधी नागपूर क्राईम ब्रांचने देखील उके आणि त्यांच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
हेही वाचा - ED Raid in Nagpur : कोण आहे वकील सतीश उके? 'या' प्रकरणांमध्ये उके यांची महत्त्वाची भूमिका