मुंबई - मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पूर्व उपनगरात जाण्यासाठी इस्टर्न फ्री वे बनवण्यात आला आहे. तसेच पश्चिम उपनगरात जाण्यासाठी कोस्टल रोडचे काम सुरु आहे. भविष्यात पूर्व उपनगरातून पश्चिम उपनगरात आणि पश्चिम उपनगरातून पूर्व उपनगरात जाण्यासाठी इस्टर्न फ्री वे व कोस्टल रोडला जोडणारा आणखी एक मार्ग बांधण्यात येणार ( Eastern Freeway Connect To Coastal Road ) आहे. यामुळे पूर्व व पश्चिम उपनगरातील तसेच मुंबई शहरातील वाहतूक कोंडी फुटेल असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला ( BMC Solution To Reduce Traffic Congestion ) आहे.
पूर्व पश्चिम उपनगर जोडणारा नवा मार्ग - मुंबईमध्ये वाहनांची संख्या जास्त आहे. शहरीकरण आणि नागरीकरण यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी झाल्याने इंधन वाया जाते तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होतो. यावर तोडगा म्हणून पालिकेने मुंबई शहरातून पूर्व उपनगरात जाण्यासाठी इस्टर्न फ्री वे उभारण्यात आला आहे. या फ्री वे मुळे शहरातून पूर्व उपनगरात जाण्याचा कालावधी कमी झाला आहे. त्याच प्रमाणे मुंबई शहरातून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी कोस्टल रोड उभारला जात आहे. कोस्टल रोडमुळे सध्या प्रवासासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात जाण्यासाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्यानंतर आता वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी इस्टर्न फ्री वे कोस्टल रोडला जोडण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक बैठक झाली असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याबाबत पालिका, एमएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
असा राबवणार प्रकल्प - मुंबईत मानखुर्द छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुंबईतील पी डेमेलो, कर्नाक बंदर असा सुमारे २० किमीचा इस्टर्न फ्री वे आहे. या मार्गावरून पूर्व उपनगरातून मुंबई शहरात हजारो वाहने येतात. ही वाहने पश्चिम उपनगरात किंवा मंत्रालय, कुलाबा, नरीमन पॉइंट अशा परिसरात जाण्यासाठी फोर्ट विभागातील रस्त्यांचा वापर करतात. मात्र या वाहनांची संख्या मोठी असल्याने शहरात नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे इस्टर्न फ्री वे कोस्टल रोडला जोडण्याचा विचार आहे. हा मार्ग केबल बहुतांशी केबल स्वरूपाचा बांधण्याचा विचार आहे. त्यामुळे जोड मार्गाचे काम वेगाने होणार असून बांधकामातील अडथळे कमी होणार आहेत. रायगड, पुण्याहून इस्टर्न फ्री वे मार्गे पश्चिम उपनगरात येणार्या वाहतूकदारांनाही या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. वाहतूक कोंडीत एक ते दीड तासांचा जाणार वेळ अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार असल्याने मोठा फायदा होणार आहे.