मुंबई - शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा शिवसेनेचा दावा होता. मात्र शिंदे गट आणि भाजपने दसरा मेळावा होऊ नये यासाठी खोडा घालून शिवसेनेची परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. न्यायव्यवस्थेने न्यायाच्या बाजूने निकाल दिल्याने न्याय व्यवस्थेचे प्रथम आभार मानतो, अशा शब्दात शिवसेना नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे सरकारने स्वतःच्या गटातील नेत्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचे महत्त्व समजून सांगावे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
न्यायालयाने मुंबई महापालिकेला खडे बोल सुनावले - शिवाजी पार्क दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकडे शिवसेनेने महिनाभरापूर्वी अर्ज केला. शिंदे गटानेही येथेच मेळावा घेण्यासाठी अर्ज पालिकेकडे केला. मुंबई महापालिकेने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत दोन्ही अर्ज फेटाळून लावले. शिवसेनेने यामुळे न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान मुंबई महापालिकेने कायद्याचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने मुंबई महापालिकेला खडे बोल सुनावले. तसेच शिंदे गटाच्या याचिका आणि बंडखोर आमदार सदा सरवणकर यांना फटकारले. शिवसेनेची याचिका ग्राह्य धरत दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेना भवन येथे शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
शिंदे गटाला शहाणपण यावे - न्यायव्यवस्थेचे आम्ही मनापासून आभार मानतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार, अशी खात्री व्यक्त केली होती. आज न्यायालयाने सत्याच्या बाजूने निकाल दिला. बाळासाहेबांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा उद्धव ठाकरेंनी आजतागायत सुरू ठेवली. मात्र, शिंदे गट आणि भाजपकडून दसरा मेळावा होऊ नये, यासाठी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे त्यांना शहाणपण यावे, असे राऊत म्हणाले.
आमची न्यायाची बाजू राऊत - न्यायालयाने लोकशाहीने दिलेले अधिकार अबाधित ठेवण्याचे काम केलेले आहे. येत्या २७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयातही आमची बाजू भक्कम असेल. आमची न्यायाची बाजू आहे, असे राऊत यांनी म्हटले. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता आम्ही घेत आलो आहोत. मात्र, शिंदे सरकारमधील आमदार जे पिसळले आहेत, दादागिरी मारामारीच्या धमकी देतात, त्यांना काय शिंदे सरकारने व्यवस्थित सूचना द्याव्यात, असा चिमटा राऊत यांनी काढला.