मुंबई - दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गटामध्ये सध्या चांगलाच वाद रंगला आहे. शिवतीर्थावर मेळावा कोण घेणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. दोन्ही गटाच्यावतीने महापालिकेकडे अर्ज केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरच मेळावा घेणार असल्याचा निर्धार केला असून कामाला लागण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. आज शनिवार (17 सप्टेंबर)रोजी शिवसेनेच्या मुंबईतील विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुखांची बैठक शिवसेना भवन येथे बैठक झाली त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
मुंबई मनपा निवडणूक येत्या दोन महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेत दोन गट पडल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे सातत्याने बैठकींचा धडका सुरु ठेवला आहे. आज मुंबईतील विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांची बैठक पार पडली. शिंदे गट आजच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर होता. तसेच, शिवाजी पार्कातील दसरा मेळाव्यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
फुटलेले सर्व नेते तोतया आहेत. जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवणार आहे. आपला दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असून सर्व आघाड्यांना सोबत घेऊन कामाला लागा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. तसेच, विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुख सोबत असल्याने आत्मविश्वास दुणावल्याचे ठाकरे म्हणाले आहेत. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांना सोबत घ्या, मोठ्या प्रमाणात शिवतीर्थवर गर्दी जमवण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. मनात कोणताही संभ्रम ठेवू नका, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांची विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुखांना देण्यास विसरले नाहीत.