मुंबई - दसरा मेळाव्याला आता काही दिवसच उरलेले असताना मुंबईत मातोश्री आणि शिवसेना भवनाबाहेर जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हे बॅनर मनसे, भाजप, शिंदे गट किंवा शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी लावले नसून आतापर्यंत दसरा मेळाव्यात ज्या पक्षाच्या नेत्यांचा उद्धार केला जायचा अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारे बॅनर लावल्याने या बॅनरची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादीचे बॅनर - शिवसेना भवन व मातोश्रीबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून होणाऱ्या दसरा मेळाव्याला समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मैदानात उतरला आहे, असे चित्र पाहायला मिळत आहे. मातोश्रीबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावाचा बॅनर आहे. त्याच लगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही शिवसेनेचा दसरा मेळावाला शुभेच्छा देण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
मेळाव्यातील भाषणात - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बॅनरबर एक संघटना एक विचार एकच मैदान, शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू द्या खूप खूप शुभेच्छा असा उल्लेख आहे. शिवसेना शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधल्या असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीने हा बॅनर लावल्याने या बॅनरची चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे नेहमीच दसरा मेळाव्यातील भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीवर तोंडसुख घेणारे उद्धव ठाकरे यावेळी आपल्या भाषणात नेमकं काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे.