मुंबई - सध्या देशात मुंबई-पुणे या शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतो आहे. या दोन्ही शहरात लोकवस्ती अधिक असून दाटीवाटीने लोक राहतात. त्यामुळे या शहरांमध्ये फिजिकल डिस्टनसिंग पाळता येत नाही. या शहरात आता कोरोनाचा कहर वाढत असल्याने नागिरकांचे आरोग्य खालावत आहे. असे असले तरिही येथील नागरिकांचे आरोग्य बिघडण्यास इतरही अनेक कारणे आहेत. त्यात महत्वाचे कारण म्हणजे मुंबई-पुणेकरांची जीवनशैली. करिअर आणि कामाच्या मागे पळत राहणारे मुंबई-पुणे येथील नागरिक वेळेवर ना खातात ना वेळेवर झोपतात. त्यामुळे अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असून त्यांना विविध व्याधींनी घेरले आहे. त्यातच या शहरांत कोरोनाचा शिरकाव झाल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले नागरिक कोरोनाचे शिकार होत आहेत. त्यामुळे मुंबई-पुणेकरांनो आता तरी जीवनशैली बदला, असे आहार तज्ज्ञ सांगत आहेत.
हेही वाचा... दारू पिणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा!
कोरोनाचा कहर भारतात सुरू आहे. मात्र, त्याचवेळी त्यातून बरे होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे अनेकांचे बळी जात आहेत. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपर टेंशन, स्थूलता अशा आजारांनी ग्रासले आहे. हे असे आजार होण्याची कारणे रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे, योग्य आहार आणि झोप यांचा अभाव, ही असल्याचे अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील आहार तज्ज्ञ जिनल पटेल यांनी सांगितले आहे. हे असे आजार साधारणतः 60 नंतर होतात. पण आता मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो शहरात हे आजार 25-30 वयातील नागरिकांत उद्धभवताना दिसत आहेत. अगदी काही लहान मुलांमध्येही स्थूलता आणि इतर आजार बळावत आहेत.
मुंबई-पुणेकरांना आता जीवनशैली बदलावीच लागेल...
वृद्धांपासून लहान मुलांमध्ये हे आजार बळावण्याचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली. जंक फूड, अवेळी जेवण, अपुरी झोप, कामाचे वाढते तास यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. त्यामुळे अनेक लहान मोठे आजार होतात, असे जिनल यांनी सांगितले आहे. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे आणि जे नियम पाळत आहेत. ते कोरोनाच्या संसर्गापासून दूर आहेत. मात्र, कोरोनावर सध्या कुठलेही औषध नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हेच आता महत्वाचे आहे. तेव्हा आता मुंबई-पुणेकरांना जीवनशैली बदलावी लागेल. किमान 8 तास झोप, संतुलित आहार, तोही वेळेत आणि व्यायाम याची सवय लावून घेणे ही काळाची गरज आहे. कोरोना कधी जाणार हे कोणालाही माहित नाही. कदाचित कोरोनासोबतच यापुढे आपल्याला जगावे लागेल. तेव्हा अशा वेळी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे, असेही जिनल पटेल म्हणतात.