मुंबई - मुंबई सिद्धिविनायक न्यासाने गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. उद्या मगळवर, २३ नोव्हेंबर रोजी अंगारकी संकष्टी असल्याने गणेश भक्तांना दर्शनासाठी मंदिरातर्फे (siddhivinayak temple in mumbai) विशेष व्यवस्था केली असल्याची माहिती सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी दिली.
हेही वाचा - ST संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव; गुणरत्न सदावर्तेंचा मुंबई उच्च न्यायालयात दावा
आज मध्यरात्रीपासून दिले जाणार दर्शन
मंगळवार, २३ नोव्हेंबर २०२१ रोजी अंगारकी संकष्टी असल्यामुळे समोवार मध्यरात्री ०१ : ३० वा. ते ०३:०० वा. श्रींच्या दर्शनासाठी मंदिर सुरू करण्यात येणार आहे. तसेच, मंगळवार पहाटे ०३:०० वा. ते ०४:०० वा. मंदिर मंगल आरतीसाठी बंद ठेवण्यात येईल. त्यानंतर मंदिर पहाटे ०४ : ०० ते दुपारी १२ : ०० वा. भाविकांसाठी खुले राहील. १२:०० वा. ते १२:३० वा. मंदिर श्रींच्या नैवेद्यासाठी बंद राहील. दुपारी १२:३० वा. सायंकाळी ०७ :०० वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहील. सायंकाळी ०७:०० ते रात्री ०८:३० वाजेपर्यंत भाविकांसाठी दुरून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रसंगी ते मुखदर्शन घेऊ शकतील. रात्री ०८ : ०० ते रात्री ०९: ३० वाजेपर्यंत श्रींची महापूजा, नैवेद्य व महाआरती होणार आहे. रात्री शेजारती नंतर भाविकांसाठी मंदिर बंद करण्यात येईल, अशी माहिती आदेश बांदेकर यांनी दिली.
ॲपद्वारे घेता येणार दर्शन
एकीकडे जग करोना महामारीतून सावरत असताना अंगारकी असल्याने विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईतूनच नाही तर, मुंबई बाहेरूनसुद्धा मोठ्या प्रमाणात भक्तांची रीघ लागण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा मंदिर व परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिरावर विशेष विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ॲपद्वारेच दर्शन घ्यावे लागणार आहे. त्यासाठी अगोदरच नोंदणी करावी लागणार आहे. ज्यांनी सिद्धिविनायक ॲप डाऊनलोड केला नाही त्यांनी ॲप डाऊनलोड करून त्याच्यावर नोंदणी करावी व दर्शन घ्यावे, असे आवाहनही आदेश बांदेकर यांनी केले आहे.
हेही वाचा - 'चौकीदारही...' वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा