मुंबई - कोरोना रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी मुंबईत ८ ठिकाणी 'कोविड जम्बो केंद्रे' सुरू केली आहेच. यामधून लाखो रुग्णांवर उपचार केले गेले. मात्र, आता रुग्णांची संख्या कमी झाल्याने ही केंद्र टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जंबो सेंटर बंद होणार असली तरी पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू राहणार आहेत असाही निर्णय घेण्यात आला आहे.
५ केंद्रे बंद करण्याचा निर्णय - मुंबईत मार्च (२०२०)पासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार वाढत असताना पालिकेच्या रुग्णालयांमधील खाटा कमी पडू लागल्या आहेत. त्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेने ८ ठिकाणी 'कोविड जम्बो केंद्रे' सुरू केली आहेत. त्यात १२ हजार ३७५ रुग्णशय्या व ९०७ अतिदक्षता खाटा होत्या. यामध्ये उपचार केंद्रांच्या माध्यमातून लाखो रुग्णांवर उपचार करण्यात आले. लसीकरण मोहीमही राबवण्यात आली. त्यानंतर रुग्ण कमी झाल्याने 'कोविड जम्बो केअर सेंटर' टप्पेनिहाय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरू राहणार - पहिल्या टप्प्यात पालिकेने ३ 'कोविड जम्बो केअर सेंटर' बंद केली आहेत. त्यानंतर दुस-या टप्प्यात ५ केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र बंद करण्यात येणार असले तरी पालिका रुग्णालय आणि सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरू राहणार असल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे.
लसीकरण सुरूच राहणार - पहिल्या टप्प्यात दहिसर, नेस्को – गोरेगांव आणि कांजूरमार्ग येथील 'जम्बो कोविड केअर सेंटर' यापूर्वीच बंद करण्यात आली आहेत. तर, आता दुसऱ्या टप्प्यात वांद्रे-कुर्ला संकुल, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास भायखळा, रिचर्डसन्स ऍण्ड क्रुडास मुलुंड, एन. एस. सी. आय. वरळी आणि मालाड येथील 'जम्बो कोविड केअर केंद्रे' बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी कार्यरत असलेली लसीकरण केंद्रे सुरु राहणार आहेत. ज्यामुळे, लसीकरणाबाबत नागरिकांची गैरसोय होणार नाही.
आवश्यकतेनुसार ही संख्या वाढविता येऊ शकेल - या दरम्यान, सेव्हन हिल्स रुग्णालयासह महानगरपालिकेची ४ प्रमुख रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालये आणि कस्तुरबा रुग्णालय या ठिकाणी कोविड बाधित रुग्णांवर औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. पालिका आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये एकूण ११ हजार १६५ खाटा आहेत. आवश्यकतेनुसार ही संख्या वाढविता येऊ शकेल. तसेच, सोमय्या जम्बो सेंटर, शीव (सायन) येथे एक जम्बो कोविड केंद्र सुसज्ज ठेवण्यात आले आहे असे संजीव कुमार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Threat Swapna Patkar : शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय स्वप्ना पाटकर यांना धमकी