मुंबई - मुंबईच्या दादर परिसरात सुरू करण्यात आलेल्या देशातील पहिल्या 'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्रा'ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर असाच उपक्रम मुंबईत विविध ठिकाणी राबविण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या पूर्व उपनगरातील नागरिकांनाही आता 'ड्राइव्ह इन लसीकरण'च्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. चेंबूरच्या 'के स्टार मॉल'च्या पार्किंग लॉटमध्ये सुरू करण्यात आलेल्या 'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्रा'चे लोकार्पण खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
शेवाळे यांच्या मागणीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चेंबूरच्या के स्टार मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात 60 वर्षांवरील नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना आपल्या गाडीत बसूनच कोरोनाची लस देण्यात येणार आहे. सोमवार ते शनिवार ही सुविधा सदर केंद्रावर उपलब्ध असून केंद्रावर येण्याच्या आधी नागरिकांनी कोविन पोर्टलमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. सरकारी आदेशानुसार सध्या केवळ 60 वर्षावरील आणि दिव्यांग नागरिकांसाठीच लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र येत्या काळात याठिकाणी 45 वर्षावरील नागरिकांचेही लसीकरण सुरू होऊ शकते. याशिवाय चेंबूर कॅम्प परिसरातील 'संत निरंकारी भवन' येथेही कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यावेळी आमदार प्रकाश फातर्फेकर, नगरसेवक अनिल पाटणकर, सुप्रदा फातर्फेकर, पालिकेचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहान व अन्य मान्यवर उपस्थित होते.