मुंबई - शासकीय विज्ञान संस्था, नागपुरचे विद्यमान संचालक डॉ. रामदास आत्राम यांची मुंबई विद्यापीठाचे नवे कुलसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, ही नियुक्ती प्रतिनियुक्तीने करण्यात आली असल्याने नवीन आणि कायमस्वरूपी कुलसचिव मिळेपर्यंत केवळ ही एक तात्पुरती सोय असणार आहे.
कोरोनामुळे माजी कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे निधन झाले होते, त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी यासाठीचा अतिरिक्त कारभार आचार्य मराठे महाविद्यालयाचे डॉ. बळीराम गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला होता. आज त्यावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जीआर काढून त्या पार्श्वभूमीवर डॉ. आत्राम यांची ही प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे.
हेही वाचा - "माझा छळ का होतोय? मला देशाकडून उत्तर हवंय", कंगनाचे जनतेला आवाहन
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यासाठी आज डॉ. आत्राम यांची ही नियुक्ती महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम ८(५) नुसार शासनास प्राप्त असलेल्या अधिकारानुसार करण्यात आली असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
आत्राम यांची ही निवड आणि त्याचा कालावधी पदावर एक वर्षासाठी अथवा त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत अथवा मुंबई विद्यापीठात नवीन कुलसचिव म्हणून नियुक्त होईपर्यंत असेल, असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या जीआरमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा - न्यायालयाच्या बृहत् पीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी व्हावी - अशोक चव्हाण