मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट असलेल्या डेल्टा प्लसचे २१ रुग्ण समोर आले आहेत. हा विषाणू मोनोक्लोनल अँटीबॉडीजला दाद देत नाही. सध्या जे लसीकरण सुरू आहे, त्यालाही हा डेल्टाप्लस जुमाणणार नाही, अशी माहिती इंडियन मेडिकल असोशिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे. तर डेल्टा प्लसवर अभ्यास सुरू आहे. अभ्यासाअंतीच जे काय असेल ते सांगता येईल, असे टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले आहे.
'डेल्टा व्हेरीयंटने महाराष्ट्रात हाहाकार उडवला होता'
राज्यात डेल्टा प्लस या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हेरियंट झपाट्याने पसरतो. तसेच तो लसीलाही जुमानत नाही अशी चर्चा आहे. याबाबत अविनाश भोंडवे बोलत होते. यावेळी बोलताना कोरोना विषाणूमध्ये बदल होऊन डेल्टा हा विषाणू तयार झाला. डेल्टा हा महाराष्ट्रात तयार झालेला असून त्यामुळे महाराष्ट्रात हाहाकार उडवला होता. डेल्टा व्हेरीयंटमुळे कोरोनाची दुसरी लाट आली होती. या दुसऱ्या लाटेदरम्यान तब्बल ४९ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. जगातही या म्यूटंटचे रुग्ण आढळून आले आहेत. इंग्लंड यूकेमध्ये गेल्या महिनाभरात अडीच पटीने रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ९० टक्के रुग्ण हे डेल्टा व्हेरीयंटचे आहेत, असे भोंडवे यांनी सांगितले आहे.
'लसीकरण, अँटीबॉडीजला जुमाणनार नाही'
डेल्टा व्हेरीयंटमध्ये पुन्हा म्युटेशन म्हणजेच बदल झाले असून त्याला डेल्टा प्लस असे नाव देण्यात आले आहे. या व्हेरीयंटवर अभ्यास सुरू आहे. सध्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज साठी जे कॉकटेल दिले जात आहे. त्यामुळे रुग्ण तीन दिवसात बरे होत आहेत. डेल्टा प्लस मात्र मोनोक्लोनल अँटीबॉडीजला दाद देत नाही. यासाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीजमध्ये बदल करावे लागतील. सध्या जे लसीकरण सुरू आहे, त्यालाही हा डेल्टाप्लस जुमाणनार नाही. तो किती वेगाने येईल याची कल्पना नाही, असे डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.
'अभ्यास सुरू आहे'
कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या डेल्टा प्लसवर सध्या अभ्यास सुरू आहे. दोन ते तीन आठवड्याचा कालावधी जाऊ द्या. अभ्यासाअंतीच जे काय असेल ते सांगता येईल. सध्या डेल्टा प्लसबाबत ज्या काही अफवा येत आहेत, त्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.
काय आहे डेल्टा प्लस -
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथम नोंदवलेला डेल्टा प्रकार हा पूर्वीपेक्षा अपेक्षेपेक्षा अधिक वेगवान होता आणि एम्समध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, 2021 मध्ये हाच व्हेरियंट देशातील दुसर्या लाटेचे कारण ठरला होते. सुरुवातीच्या काळात चीनमधून हा विषाणू भारतात आला आहे आणि सध्या देशभरात या विषाणूचा प्रादुर्भाव आहे. डेल्टा हा करोना विषाणूचा जनुकीय बदल झाल्यामुळे तयार झालेला प्रकार आहे. या विषाणूमध्ये असे बदल नियमित होत असतात. त्याची संसर्गक्षमता आता अधिक वाढली आहे. त्यामुळे पूर्वी जी लक्षणे सहा ते सात दिवसांनी दिसायची, ती आता संसर्ग झाल्यानंतर लवकर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरित डॉक्टरांकडे गेल्यास लक्षणांची तीव्रता वाढणार नाही. डेल्टा विषाणू हा अधिक संसर्गकारक आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींमध्ये चटकन पसरतो. तो आधीच्या स्ट्रेनपेक्षा शरीरात लवकर पसरतो. त्यामुळे आजाराची लक्षणे चार ते पाच दिवसांत दिसू लागतात. या स्ट्रेनचा संसर्ग झाल्यास औषधोपचार हे करोनाच्या उपचारपद्धतीसारखेच आहेत. मास्क वापरणे, हात धुणे आणि गर्दीत न जाणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे.
डेल्टा प्लस व्हेरियंट -
नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट (B.1.617.2.1 किंवा AY.1) डेल्टामधील उत्परिवर्तनामुळे किंवा B.1.617.2, व्हेरिएंटमुळे तयार झाला आहे. N501Y मधील पूर्वीच्या डेल्टा उत्परिवर्तीच्या बाजूने, डेल्टा प्लसमध्ये K417Nचे उत्परिवर्तन आहे. संशोधकांना वाटते की, या दोन उत्परिवर्तनांमुळे हा विषाणू अधिक संक्रमित होऊ शकतो. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सांगतात, कोव्हिड-19 हा RNA व्हायरस आहे. त्यामुळे व्हारस म्युटेट होण्याची शक्यता खूप जास्त असते. 'डेल्टा व्हेरियंटमध्ये आणखी म्युटेशन झाल्यामुळे, नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला. 'डेल्टा प्लस' व्हेरियंटमध्ये डेल्टा व्हेरियंटमध्ये असलेले सर्व म्युटेशन आहेत. त्यासोबत स्पाइक प्रोटीममध्ये झालेले K417N म्युटेशनदेखील आढळून आले आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण -
डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथे, जळगाव येथे ७, मुंबई येथे २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, डेल्टा प्लसमुळे देशात रुग्णाचा पहिला मृत्यू हा मध्य प्रदेशमध्ये झाला आहे.
त्रिसूत्रीचे पालन करा -
कोरोना विषाणूत बदल होऊन डेल्टा प्लस हा व्हेरियंट तयार झाला आहे. नागरिकांनी कोरोनाबाबतच्या मास्क लावा, हात सतत धुवा, सुरक्षित अंतर ठेवा या त्रिसूत्रीचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन केले तर कोणत्याही व्हायरस पासून बचाव केला जाऊ शकतो, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
हेही वाचा -'डेल्टा प्लस रुग्णाबाबत पालकमंत्री उदय सामंत माहिती लपवत आहेत'