मुंबई - कोलकात्यामध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी 14 जूनला संप पुकारला होता. मात्र, सरकारने या संपाला दाद दिली नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारला आहे. आज सकाळी 10 वाजतापासून आपत्कालीन वैद्यकीय सेवा वगळता देशभरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्याची माहिती आयएमए आणि डीएमए या डॉक्टरांच्या संघटनेने दिली आहे.
काय होती घटना ?
10 जूनला बंगालमधील नीलरत्न सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील एका 75 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे चिडलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरला शिवीगाळ केली. त्यावेळी शिवीगाळ करणाऱ्या नातेवाईकांनी माफी न मागितल्यास मृत्यूचे प्रमाणपत्र देणार नाही, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली. त्यामुळे दोन्ही बाजूंनी झटापट सुरु झाली. काही वेळाने एका समूहाने हत्यांरासह वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात घुसत हल्ला केला. या हल्ल्यात दोन डॉक्टर गंभीर जखमी झाले. यामुळे पश्चिम बंगाल येथील डॉक्टरांनी संप पुकारला. त्याला आता देशभरातील डॉक्टरांनी पाठिंबा दिला आहे.
पश्चिम बंगालमधील डॉक्टरवर केलेल्या हल्ल्यातील हल्लेखोरांवर कारवाई करा, डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यावर योग्य त्या शिक्षेची तरतूद करायला हवी. यासाठी भारतीय दंड संहिता दिवाणी प्रक्रिया संहितेतही बदल करण्यात यावेत, आदी मागण्यांसाठी आज संप पुकारण्यात आला आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप माघे घेणार नाही, असे संघटनेने दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सरकारने आता या डॉक्टरांच्या संपाची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा देशभर अनेक रुग्णांचे मोठे हाल होणार असल्याची चर्चा आहे.