मुंबई : मुंबईत गेल्या दोन महिन्यांत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर रुग्णालयात आणि कोविड सेंटरमध्ये उपचार करण्याचे काम निवासी डॉक्टरांकडून केले जात आहे. या डॉक्टरांना कोविड भत्ता म्हणून 10 हजार रुपये देण्याची मागणी मार्ड या डॉक्टरांच्या संघटनेकडून करण्यात आली आहे. या मागणीला पालिका प्रशासन लवकरच मंजुरी देणार आहे. यामुळे निवासी डॉक्टरांना कोविड भत्ता मिळणार आहे.
निवासी डॉक्टरांकडून उपचार
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली. डॉक्टर, नर्स आदी कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली. कोरोना रुग्णांवर रात्रंदिवस उपचार करण्यासाठी निवासी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. निवासी डॉक्टरांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कवच नाही. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन म्हणून दरमहा 10 हजार रुपये कोविड भत्ता द्यावा अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केल्याचे निवासी डॉक्टर संघटनेचे (मार्ड) चे अध्यक्ष डॉ निलेश कल्याणकर यांनी सांगितले.
कोविड भत्ता द्या
कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे काम निवासी डॉक्टर करत आहेत. निवासी डॉक्टरांना आरोग्य विमा मिळत नाही. मागील वर्षी कोरोना पसरत असताना 10 हजार रुपये कोविड भत्ता दिला जात होता. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर हा भत्ता बंद करण्यात आला. मागील वर्षाप्रमाणे आताही कोरोनाचे रुग्णसंख्या वाढली असल्याने त्यांच्यावर निवासी डॉक्टर उपचार करत आहेत यामुळे पूर्वी दिला जाणारा महिना 10 हजार रुपये कोविड भत्ता पुन्हा सुरु करावा अशी अपेक्षा निवासी डॉक्टरांची आहे. पालिका आयुक्तांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मंजुरीनंतर हा भत्ता दिला जाणार असल्याची माहिती कल्याणकर यांनी दिली.
86 हजार 410 सक्रिय रुग्ण
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 86 हजार 692 वर पोहोचला आहे तर एकूण मृतांचा आकडा 12 हजार 404 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 4 लाख 86 हजार 622 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 86 हजार 410 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 47 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त आढळून आल्याने 106 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहे. तर 1 हजार 171 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 49 लाख 82 हजार 532 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.