मुंबई - देशात डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नातेवाईकांकडून डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले होत असताना दुसरीकडे कायदा कडक नसल्याने हल्लेखोरांचे फावत आहे. त्यामुळे कायदा कडक करा आणि डॉक्टरांवरील हल्ले रोखा, असे म्हणत आता देशभरातील डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून हे एक दिवसीय आंदोलन होत असून या आंदोलनाला निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पाठिंबा दिला आहे. त्यानुसार आज मुंबईसह राज्यभरातील सरकारी रुग्णालयात आंदोलन करण्यात आले.
या आहेत डॉक्टरांच्या मागण्या -
कोरोनाकाळात देशभरातील डॉक्टर रुग्णसेवा देत आहेत. असे असताना कोरोना पूर्व आणि कोरोनाकाळात ही डॉक्टरांवरील हल्ले सुरुच आहेत. देशभरात डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहेत. या हल्ल्याची दखल घेत हल्ले करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. पण कायद्यात या गुन्ह्यासाठी कडक तरतूदी नसल्याने या हल्लेखोरांना कडक शिक्षा होताना दिसत नाही. त्यामुळे हल्ले वाढतच असल्याने आता लवकरात लवकर कायद्यात कडक तरतुदी करण्याची आमची मागणी असल्याची माहिती आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी दिली आहे. तर या मागणीसाठी आज आम्ही देशभर प्रतिकात्मक आंदोलन करत आहोत. तसेच या मागण्या केंद्र सरकारसमोर ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.
मार्डचा पाठींबा -
आयएमएच्या या आंदोलनाला मार्डनेही पाठिंबा दिला आहे. त्यानुसार आज जे.जे. रुग्णालयात आंदोलन करण्यात आले असून राज्यभर आंदोलन करण्यात येत असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी सांगितले आहे.