मुंबई - इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र शाखेच्या डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर, मी डॉक्टरांबद्दल अपमानास्पद बोलला नाही. माझ्या मनात पाप नव्हते. तसेच, माझ्यावर डॉक्टरांनीच उपचार केले आहेत. डॉक्टरांविषयी मला प्रेम, आस्था आणि आदर आहे आणिी राहील, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांचा अपमान करण्याचा संबंधच नाही, असे म्हणत डॉक्टरांच्याविषयी केलेल्या विधानानंतर उठलेल्या वादंगावर पडदा टाकण्याचे काम केले आहे.
आयएमएनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. आयएमए कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या बैठकीत राऊत यांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. डॉक्टरांबद्दल अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समस्त डॉक्टरवर्गाची माफी मागावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने केली आहे.
हेही वाचा - 'फक्त महाराष्ट्रातील नव्हे, तर संजय राऊतांनी संपूर्ण जगातील डॉक्टरांची माफी मागावी'
मी डब्ल्यूएचओ बद्दल बोललो, याचा अर्थ इथल्या डॉक्टरांचा अपमान केला असे नाही. मी नेहमीच डॉक्टरांचा सन्मान केला आहे. मी डब्ल्यूएचओ बद्दल बोललो, मीच काय, ट्रम्प, रशिया किंवा अन्य देशांनीही डब्ल्यूएचओ वर बोट ठेवले आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा गैरसमज झाला असेल तर बोलायला मी तयार आहे, यावर राजकारण करू नये, असे राऊत म्हणाले.
काय म्हणाले होते खासदार संजय राऊत...
डॉक्टरांपेक्षा मी कंपाऊंडरकडून औषधे घेतो. डॉक्टरपेक्षा कंपाउंडरला जास्त कळतं. मी तर नेहमी कंपाउंडरकडून औषध घेतो, असे विधान राऊत यांनी केले होते. तसेच राऊत यांनी डब्ल्यूएचओवरही निशाणा साधत
डब्ल्यूएचओला काय कळतं, सीबीआयसारखेच आहे ते, इकडून तिकडून माणसे गोळा केलेली असतात, डब्ल्यूएचओच्या नादाला लागले म्हणून जास्त कोरोना वाढला, असे संजय राऊत म्हटले होते.