मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचे त्यांच्या राहत्या घरीच लसीकरण करण्याची मागणी खासदार मनोज कोटक यांनी केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिका प्रशासन लवकरच याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
खासदारांच मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र
मुंबईकरांना राहत्या घरी कोरोनाची लस देण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत डोअर टू डोअर लस देण्याची मागणी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केली होती. मनोज कोटक यांनी गुरुवारी 29 एप्रिलला याबाबतचे एक पत्र मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना लिहिले होते. यात कोटक यांनी पालिकेच्या सहकार्याने स्वयंसेवी संस्थांना वैद्यकीय सुविधेसह परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
नियमांचे पालन करून लसीकरण
मनोज कोटक यांच्या मागणीवर पालिकेकडून सकारात्मक विचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार, एखाद्या सोसायटीचे थेट रुग्णालयाशी टायअप करायचे. त्यानंतर सर्व नियमांचे पालन करून लसीकरण करायचे, अशी संकल्पना पालिका प्रशासन अंमलात आणू शकते.
मुंबईकरांना घरीच कोरोनाची लस लवकरच मिळेल
मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना कोणतीही त्रास न देता सहजपणे लस दिली जाऊ शकते. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांना लवकर कोरोना लस देणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन मनोज कोटक यांनी बीएमसीकडे डोर टू डोर लस देण्याची मागणी केली होती. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना राहत्या घरी कोरोनाची लस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसांत पालिका प्रशासन याबाबतचा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.