मुंबई - केवळ पालिकेच्या शाळांचे निर्जंतुकीकरण करून खासगी शाळांची जबाबदारी झटकून मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करत आहे. असे करून पालिका मुंबईतील लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केला.
हेही वाचा - भांडूपच्या जंगलात सापडले नवजात अर्भक
मुंबई महापालिका विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करत आहे
४ ऑक्टोबरपासून मुंबईतील शाळा सुरू करण्यास मुंबई महापालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविला आहे. काल मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात शाळा सुरू करण्याबाबत शाळांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. शाळा सुरू करण्याआधी मुंबई महापालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहाय्यक आयुक्त यांच्या साहाय्याने सोडिअम हायपोक्लोराईड सोल्युशनने निर्जंतुकीकरण करून घ्यावे. तर, इतर खासगी व्यवस्थापनाच्या शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी पालिकेने झटकली असून ती खासगी शाळांवर टाकली आहे. हा एक प्रकारचा भेदभाव असून खासगी अनुदानित, विनाअनुदानित व सेल्फ फायनान्सच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी पालिका खेळ करीत असल्याचा आरोप अनिल बोरनारे यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी पालिकेने घ्यावी
या खासगी व्यवस्थापनाच्या विविध शाळांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीचे पाच लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. या ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे पालक मुंबई महानगर पालिकेचा नियमित कर भरणारे आहेत. मग या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी पालिकेने घेतली पाहिजे. मात्र, पालिका व्यवस्थापन यामध्ये भेदभाव करीत असल्याचा आरोप अनिल बोरनारे यांनी केला आहे.
हेही वाचा - मरोळ मरोशीत मेट्रो चाचणी: आरेतील एकाही वृक्षाला धक्का लावू नका- मुख्यमंत्र्यांचे निर्देश