मुंबई - मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात दरडी आणि घरे कोसळून ३० जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यातही गेल्या काही दिवसांत काही ठिकाणी दरड कोसळून २१३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या परिसरांमध्ये प्रतिबंधात्मक बाबींची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी दिले.
हेही वाचा - जिया खान आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, पांचोलीने केले निर्णयाचे स्वागत
यंत्रणांमध्ये चांगला समन्वय -
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अधिक प्रभावी आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाद्वारे नियमितपणे आढावा व समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात येत असते. यानुसार दरवर्षी प्रमाणे यंदाच्या पावसाळ्याबाबत ‘मिड मान्सून’ आढावा व समन्वय बैठकीचे आयोजन हे महानगरपालिका क्षेत्रातील दोन्ही जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये चांगले समन्वयन साधले जात असून, आपत्कालीन व्यवस्थापन विषयक सुनिश्चित कार्यपद्धतींची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्याचे निर्देश काल झालेल्या आढावा व समन्वय बैठकीदरम्यान सर्व संबंधित यंत्रणांना बैठकी दरम्यान देण्यात आले. त्याचबरोबर, दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या परिसरांमध्ये प्रतिबंधात्मक बाबींची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती भिडे यांनी दिली.
अधिक प्रभावी समन्वय -
आपत्कालिन व्यवस्थापन विभागाच्या बैठकी दरम्यान विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींनी त्यांनी केलेल्या कामकाजाबद्दल माहिती देण्यासोबतच अधिक प्रभावी समन्वयाच्या दृष्टीने कार्य करताना आलेल्या आव्हानांची, करण्यात आलेल्या उपाययोजनांची व भविष्यातील नियोजनाची संक्षिप्त माहिती उपस्थितांना दिली. तर, काही विभागांद्वारे संगणकीय सादरीकरणाद्वारे देखील माहिती देण्यात आली. या बैठकी दरम्यान आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने यंदाच्या पावसाळ्यात करण्यात आलेल्या विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. तसेच, उर्वरित पावसाळ्यात अधिक प्रभावी समन्वय साधण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आल्याचे भिडे यांनी सांगितले.
या विभागाचे अधिकारी उपस्थित -
आढावा व समन्वय बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, मुंबई शहर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी मार्गदर्शन केले. तसेच, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी या बैठकीचे समन्वय व सूत्रसंचालन केले. बैठीकीला मध्य व पश्चिम रेल्वे, भारतीय नौसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, भारतीय हवामान खाते, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई मेट्रो, राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते, बेस्ट, विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. त्याचबरोबर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त व विविध खात्यांचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित होते.
हेही वाचा - राज्यातील १४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, हिंगोलीचे जिल्हाधिकारी बदलले