मुंबई - महाराष्ट्रात मार्च महिन्यापासून सर्व मंदिरे बंद आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर अद्यापही मंदिरे उघडण्यात आलेली नाहीत. याविरोधात भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून आज राज्यभरात विविध मंदिरांबाहेर भाजपाने आंदोलनही केले. पण या सर्व पार्श्वभूमीवर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वाद पेटला आहे. विशेष म्हणजे, या वादात भाजपा व शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही उडी घेतली आहे.
भारतात सर्वाधिक कोरोना व्हायरसमुळे त्रस्त असलेले महाराष्ट्र हे राज्य आहे. त्यामुळे मंदिरे उघडून आणखी कोरोना रुग्ण वाढू नयेत, अशी भूमिका घेत राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. यावर भाजपा आक्रमक झाली आहे. मंदिरे बंद असल्यामुळे त्याच्यावर ज्यांची उपजीविका आहे, अशा हजारो लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई सरकारकडून दिली जात नाही. त्यामुळे मंदिरे या लोकांची जगणे सुसह्य करावे, असे भाजपचे म्हणणे आहे. तर, दसऱ्याचा सण काही दिवसावर आहे. नवरात्राच्या काळात मोठ्या प्रमाणावर मंदिरांमध्ये गर्दी होत असते, त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे अजून काही काळ मंदिरे बंद ठेवण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे.
मात्र भाजपाने मंदिरांसाठी आज थेट आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. राज्यात बार सुरू झाले आहेत, पण मंदिरे का नाहीत, असा सवाल करत भाजपाने आज मुंबई, कोल्हापूर, अकोला, शिर्डी, पुण्यासह राज्यभरात विविध मंदिरांसमोर निषेध आंदोलन सुरू केले आहे. इत्यादी या ठिकाणी मंदिरे पुन्हा उघडण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मुंबईत प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरासमोर निदर्शनाच्या वेळी भाजपा कार्यकर्ते आक्रमक होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी धक्काबुक्की झाल्याचे निदर्शनास आले.
राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
भाजपाच्या या आंदोलनचा धागा पकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला मंदिरांच्या मुद्द्यावरून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 'सरकारने एका बाजूला बार, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स, समुद्रकिनारे उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र दुसऱ्या बाजूस मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे अद्याप बंद ठेवली आहेत. हा विरोधाभास आहे. तुम्ही स्वत: हिंदुत्ववादी आहात. तुम्हाला धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार वाटतो. मात्र आता तुम्हीच धर्मनिरपेक्ष झालात का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.'
उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर
हिंदुत्वाच्या मुद्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेवढ्याच तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. 'माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही', असे ठाकरे यांनी या पत्राद्वारे सुनावले आहे. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत-खेळत घरात स्वागत करणे, हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा टोलाही त्यांनी राज्यपालांना लगावला आहे.
केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे धर्मनिरपेक्षता असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतली, त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा ‘धर्मनिरपेक्षता’ आहे, तो आपल्याला मान्य नाही का? असे प्रश्नही ठाकरेंनी उपस्थित केले आहेत. राज्यात अनेक पक्ष आहेत. फक्त भाजपाची शिष्टमंडळे राज्यपालांची भेट घेऊन मंदिरे सुरू करण्याची मागणी करत असल्याचे दिसते. हा योगायोगच म्हणावा लागेल, अशी कोपरखळी ठाकरेंनी मारली आहे. माझ्या जनतेची काळजी घेण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोश्यारींना लिहिले आहे.
चंद्रकांत पाटील यांची वादात उडी
या वादात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उडी घेतली आहे. तुम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे की नाही, हे जनता ठरवेल, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. लोकांना मंदिरात जाताना आता कायद्याचा धाक दाखवता का? जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्याच्या पत्राचा निषेध केला. तसेच, उद्दामपणाने उत्तर द्यायचे होते, तर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना सांगायच होते, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
संजय राऊतांची पाठराखण
त्यापाठोपाठ शिवसेनेचे वरिष्ठ नेते संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेची री ओढली आहे. हिंदुत्व हा शिवसेनेचा आत्मा आहे. त्यामुळे आम्हाला कोणाकडूनही हिंदुत्वाचे धडे घेण्याची गरज नाही. आम्ही आंतर-बाह्य हिंदुत्ववादी आहोत, असे खासदार राऊत म्हणाले.
आशिष शेलार यांची टीका
भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली; याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना ज्यांनी मुंबईचे पालकमंत्री केले; पंढरपुरात जाऊन विठ्ठलाच्या मूर्तीला स्पर्शही ज्यांनी केला नाही. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? ही तर सत्तेसाठी लाचारी आहे, असे शेलार यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी या वादावरून भाजपाला लक्ष्य केले आहे. 'भाजपाच्या सांगण्यावरून राज्यपाल हे करत आहेत. राज्यपाल हे महामहिम आहेत त्यांनी नि:पक्षपाती असायला हवे. मात्र ते राजकारण करत असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. तर, किमान हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळसाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व तरी पाळा, असा सल्ला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
प्रकाश आंबेडकर आणि मनसेचेही आंदोलन
पंढरपूर आणि शिर्डीमध्ये मंदिर खुली करण्यासाठी आंदोलन करणारे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
एकूणच मंदिराच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजपा या दोघांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही हीच मागणी लावून धरली आहे. मात्र या वादापासून तर्तास तरी लांब राहण्याची भूमिका मनसेने घेतली आहे.
एमआयएमही रिंगणात
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनीही धार्मिक स्थळे उघडण्यासाठी औरंगाबाद येथे आंदोलन केले होते. औरंगाबादमधील एका मशिदीत बळजबरी प्रवेश करण्याचा प्रयत्न त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला होता. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दुसरीकडे नेऊन सोडले होते.