मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांचे विश्वासू व निष्ठावंत नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आता गृह खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गृहमंत्री पदासाठी वळसे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आला असल्याची माहितीही या पत्रात देण्यात आली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
हेही वाचा - परमबीर सिंग यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी, १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश
परमबीर सिंग यांनी केले होते अनिल देशमुखांवर आरोप
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या गंभीर आरोपानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष होतं. परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करून या प्रकरणाची चौकशी सीबीआयद्वारे करण्यात यावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली. या याचिकेवर आज सुनावणी झाली. परमबीर सिंग यांनी आपल्या पत्राद्वारे गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाची प्राथमिक चौकशीचा अहवाल येत्या पंधरा दिवसात कोर्टासमोर सादर करावा अशा प्रकारचे निर्देश न्यायालयाने दिलेत. या निर्देशानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक होऊन गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं सांगण्यात आलं. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
गृहमंत्री पद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून गृहमंत्रीपदासाठी सर्वात पुढे दिलीप वळसे पाटील यांचं नाव चर्चेत होते. अखेर त्यांच्याकडेच गृहमंत्री पद देण्यात आले आहे. दिलीप वळसे-पाटील हे शरद पवार यांच्या अत्यंत निकटवर्ती मानले जातात. अशा कठीण परिस्थितीत सर्वात विश्वासू व्यक्तीकडे हे पद असण्याची गरज असल्याने दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाला प्रथम पसंती शरद पवारांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - ...तर चंद्रकांत पाटील हे फडणवीसांच्या मतदार संघातून निवडणूक लढवतील - मुश्रीफ
दिलीप वळसे-पाटील यांची कारकीर्द
- 30 ऑक्टोबर 1956 रोजी पुण्यातील आंबेगाव येथे जन्म
- मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयातून विधी शाखेत पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण
- शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि निकटवर्तीय अशी वळसे पाटील यांची ओळख
- शरद पवार यांचे स्वीय सहायक म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली
- 1990 मध्ये जनता पार्टीचे किसनराव बानखेळे यांचा पराभव करत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले
- 1990 आणि 1995 मध्ये काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवून त्यांनी विजय संपादन केला
- त्यानंतर तेव्हापासून ते आतापर्यंत सलग सात वेळा ते आंबेगावमधून निवडून आले आहेत
- 1999 ते 2009 या कालावधीत आघाडी सरकारमध्ये अर्थ व नियोजन, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण तसेच वैद्यकीय शिक्षण या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
- वैद्यकीय खात्याचे मंत्रिपद सांभाळताना वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी महत्वाचे बदल त्यांनी केले
- अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यतेची प्रक्रियाही अधिक सुरळीत करण्यासाठीचे निर्णय त्यांनी घेतले
- महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात एमकेसीएलच्या स्थापनेत वळसे-पाटील यांची महत्वाची भूमिका राहिली आहे
- सध्या उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर आहे
- सहकारी साखर कारखान्यांच्या राष्ट्रीय फेडरेशनचेही ते अध्यक्ष आहेत