मुंबई - आशियातील सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या भागात रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अशीच स्थिती राहिली तर मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागेल. हा धोका लक्षात घेत सरकार आणि पालिकेने घरोघरी जाऊन प्रत्येक धारावीकरांची तपासणी अर्थात स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून रुग्ण वाढणार नाहीत.
धारावीतील चिंचोळ्या गल्लीत, दाटीवाटीच्या परिसरात जाऊन साडे सात लाख नागरिकांचे स्क्रिनिंग करणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे हे आव्हान पेलण्यासाठी माहीम-धारावी मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशन पुढे आली आहे. पालिका आणि असोसिएशनमध्ये झालेल्या बैठकीनुसार धारावीतील स्थानिक डॉक्टरांची व्हॅलेंटरी डॉक्टर म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्याप्रमाणे स्थानिक डॉक्टरांना आवाहन करण्यात आले असून आतापर्यंत 15 डॉक्टर पुढे आले आहेत. तर आणखी 35 डॉक्टरांची गरज असून लवकरच हा आकडा पूर्ण होईल अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र शृंगारपूरकर यांनी दिली आहे.
कोरोनाचा धोका वाढता असून साडे सात लाख नागरिकांचे स्क्रिनिंग हे आव्हान मोठे आहे. आता जे 15 डॉक्टर पुढे आले आहेत त्यांच्या माध्यमातून शनिवारपासूनच या कामाला सुरुवात होईल. जसे डॉक्टर वाढतील तशा टीम वाढवत दोन-तीन दिवसांत 50 टीम कार्यरत होतील. एका टीममध्ये एक डॉक्टर आणि 3 आरोग्य मदतनीस असतील. प्रत्येक घरात जाऊन ते तपासणी करत कुणाला क्वारंटाईन करण्याची, कुणाची चाचणी करण्याची तर कुणाला आयसोलेट करावं लागणार आहे हे शोधून काढतील. जेणेकरून रुग्ण वेळेत सापडतील आणि पुढची परिस्थिती गंभीर होणार नाही हा त्यामागचा उद्देश आहे. दरम्यान या मोहिमेत स्थानिक डॉक्टर असल्याने नागरिक अधिक विश्वास दाखवत सहकार्य करतील असा विश्वास डॉ शृंगारपूरकर यांनी व्यक्त केला आहे.