मुंबई - क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणापासून राज्यात सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी थांबता थांबत नाही आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे ड्रग्स प्रकरणात सातत्याने आरोप करत आले आहेत. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यापासून सुरू झालेला मलिक यांच्या आरोपांचा सिलसिला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या कुटुंबा पर्यंत पोहोचला आहे. कधी पत्रकार परिषद तर कधी ट्विटरच्या माध्यमातून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिकने देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील नबाव मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
हेही वाचा - एसटी संप : प्रवाशांची गैरसोय होत आहे, संप मागे घ्यावा, अनिल परबांचे आवाहन
सार्वजनिक पणे माफी मागा..
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नबाव मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 48 तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलीट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जा, असे नवाब मलिक यांना बजावण्यात आले आहे. मानहानीच्या खटल्यासोबतच फौजदारी कारवाईचा इशारा देखील नोटिशीतून देण्यात आला आहे. भारतीय दंडविधानच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
अमृता फडणवीस यांचा नवाब मलिकांवर आरोप
या सर्व ड्रग्स प्रकरणात मुख्यत: आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस नवाब मलिक यांच्या रडारवर आहेत. अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आरोपांची माळच लावली आहे. देवेंद्र फडणवीस यांचेच ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. तेव्हापासून मलिक विरुद्ध फडणवीस असा सामना रंगला आहे. तर, मलिकांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे, सर्व ड्रग्सचा धंधा फडणवीस यांच्यापासूनच सुरू होतो, असा आरोप केला होता. अमृता फडणवीस यांनी देखील अलीकडेच मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. बेनामी आणि काळी संपत्ती वाचवण्यासाठी नवाब मलिक लोकांवर आरोप करत आहेत. त्याचबरोबर वारंवार पत्रकार परिषद घेऊन खोटे बोलून आपल्या जावयाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.
हेही वाचा - एसटी कामगारांना दिलासा देणे शक्य; सरकारची इच्छाशक्ती नाही - प्रवीण दरेकर