मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर शब्दांचा हल्ला चढवला आहे. ‘विरोधक गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा देत आहेत. मी म्हणतो त्यांनी आता रस्त्यावर जरुर उतरावं. पण कोरोना विरुद्ध लढाई लढण्यासाठी’, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय. होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत. आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची”, असं ट्वीट करत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला हाणलाय. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री ‘मातोश्री’ किंवा ‘वर्षा’ बंगल्यावरुनच अधिकाऱ्यांना सूचना आणि आदेश देत होते. त्यावेळीही विरोधक मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करत होते. आता पुन्हा एकदा फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केलीआहे.
फडणवीसांची फेसबुक पोस्ट
मुख्यमंत्र्यांनी आपल्या संबोधनात जगात कुठे कुठे किती किती वेळा लॉकडाऊन केला याची माहिती दिली. मात्र फडणवीसांनी तीथं लॉकडाऊन करताना त्या त्या सरकारांनी पर्यायी उपाययोजनाही काय केल्या याची यादीच सादर केली आहे. शिवाय तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा असे सांगत विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल असा खोचक सल्ला ही त्यांनी ठाकरे यांना दिला.
अशी आहे फेसबुक पोस्ट
फ्रान्सने तिसर्यांदा लॉकडाऊन लावला...
पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले...
हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’...
पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला...
डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती...
पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज...
ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत...
पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्यांना मदत
एवढेच नाही तर वेतन न मिळणार्यांना 800 युरोंपर्यंत मदत !
बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय...
पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय...
पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे...
पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले...
आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत...
पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय...
फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत...
पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय...
युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय...
तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!
विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.
होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत...
आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची...
काय म्हणाले होते मुख्यमंत्री
राज्यात लॉकडाऊन लावला तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा विरोधकांकडून दिला जात आहे. मी म्हणतो आता रस्त्यावर उतराच. आता सगळ्यांनीच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. पण रस्त्यावर उतरायचं ते आंदोलन, मोर्चांसाठी नाही. तर लोकांच्या सेवेसाठी. ज्या घरात सर्वच कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या मदतीसाठी, जे आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटसाठी जे जिवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावत आहेत, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना केलंय.
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून लॉकडाऊनचे संकेत, प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे जनतेला आवाहन