मुंबई - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर काम करणाऱ्या दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर राज्यांत संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून दीपाली चव्हाण प्रकरणात वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, अवघ्या 28 वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलन झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन करावे लागते. त्याशिवाय सरकार हलत नाही.
हेही वाचा-निवेदन दिले, गाठीभेटी घेतल्या, पैसेही फेकले तरी दीपालीची बदली नाही-भावनिक पतीचा आरोप
आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि विशेष सरकारी वरील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे. खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट करण्यात आला आहे.
हेही वाचा- शिवकुमारच्या विक्षिप्तपणाची कर्मचाऱ्यांना धास्ती -दीपालीच्या सहकाऱ्यांची माहिती
दरम्यान, दीपाली चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात वनविभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून गुरुवारी सायंकाळी आपल्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्त्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी, पती राजेश मोहिते आणि आई शांताबाई चव्हाण यांच्या नावे तीन स्वतंत्र पत्र लिहिले होते. या तिन्ही पत्रात उपवनसंचालक विनोद शिवकुमार यांच्या जाचामुळे आत्महत्त्या करीत असल्याचे नमूद केले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही पत्रात अपर प्रधान मुख वन संरक्षक रेड्डी यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून ते तक्रारीची दाखल घेत नव्हते. त्यांचा हात शिवकुमारच्या डोक्यावर आहे असेही दीपाली चव्हाण ने लिहिले आहे. असे असताना या प्रकरणात शिवकुमारला अटक झाली असताना रेड्डीची मात्र नागपूरला बदली करण्यात आली. दरम्यान विविध स्तरावर रेड्डी विरोधात आंदोलन पेटले. रेंजर्स असोसिएशनसह भाजप, युवास्वाभिमान हे राजकीय पक्ष या आंदोलनात उतरले होते.