मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करतात हे कोणालाच कळत नाही. पण, मोदी काय करतात हे सर्वांना माहिती आहे. ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणत मोदींनी देशातील भ्रष्टाचार बंद केला, असे म्हणत आज पंतप्रधान मोदींचे गुणगान गात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योद्धा संन्यासी असल्याचे सांगितले आहे.
फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा सप्ताह सुरू केला आहे. यावेळी व्हर्च्युअल रॅलीत बोलताना फडणवीस म्हणाले की, या देशात भ्रष्टाचाराच्या विरोधात मोदी यांनी मोहीम राबवत देशातून भ्रष्टाचार नष्ट केला. तसेच प्रत्येक गरीबांपर्यंत आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत मोदींनी केली. तसेच स्वामी विवेकानंद यांचे गुण हे मोदी यांच्यात आहेत. दिल्लीमधली एक प्रस्थापित व्यवस्था होती, ती व्यवस्था एकच सांगायची की, आमचा भाग व्हा नाहीतर संपून जा, त्याला मोदी घाबरले नाहीत. त्यांनी आव्हान दिलं आणि दिल्लीत एक नवीन व्यवस्था उभी केली.
हेही वाचा -आजपासून एसटी १०० टक्के क्षमतेने सुरू... प्रवासीही योग्य खबरदारी घेऊन करतायत प्रवास
पुढे फडणवीस म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणात असंतोष माजला होता. तोदेखील मोदी यांच्यामुळे बंद झाला. आता कोरोनाच्या काळात महाराष्ट्राच्या मंत्रालयात मी गेलो होतो. तेव्हा त्या ठिकाणी मला शुकशुकाट दिसला. त्याचवेळी मी दिल्लीच्या मंत्रालयात गेलो. तेव्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालले होते. तसेच मोदी आल्यामुळे देशात जीडीपी वाढवून देशाची संपत्ती वाढवली नाही तर प्रत्येक गरीबाची काळजी घेत अर्थव्यवस्था चालवली आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात देश रसातळाला गेला, असा आरोप फडणवीस यांनी केला.
मोदी फक्त बोलत नाहीत तर कामही करून दाखवतात. अकराव्या स्थानाचा भारत चौथ्या स्थानी आला. अब्जावधीची गुंतवणूक भारतात आली. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन मोदींनी केले. राम मंदीर उभारले, 370 कलम रद्द केले, अशी अनेक कामे केंद्राने केली असल्याचे गुणगाण देवेंद्र फडणवीस यांनी गायले.