मुंबई - आजपासून मुंबईत दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमिवर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, एमपीएससी, साखर कारखाना आणि इतर मुद्यांवरून सरकारला धारेवर धरत खरमरीत टीका केली. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार दिशाभूल करून वेळ काढण्यासाठी इम्पेरिकल डाटाबाबत ठराव आणत आहेत, असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. तर, ओबीसी समाज, मराठा समाज आणि मागासवर्गियांसाठी सरकार कोणताही प्रयत्न करत असेल तर त्याला आमचं समर्थन राहील, त्यामुळे आम्ही या ठरावाला समर्थन देणार असल्याचं फडणवीस म्हणाले.
ओबीसींचे आरक्षण परत मिळवायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या प्रमाणे राज्य मागासवर्गाने इम्पेरिकल चौकशी करून त्याचा अहवाल सादर केल्यानंतरच ते आरक्षण परत मिळू शकतं, असेही फडणवीस म्हणाले. ओबीसी आरक्षणाबाबत सरकार १५ महिने का झोपले होते? या प्रश्नाचे उत्तर देता येत नसल्याने राज्य सरकार हे केंद्र सरकारवर प्रकरण ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, असा हल्ला फडणविसांनी चढवला. शिवाय त्यांनी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका केली. तसेच चंद्रकांत पाटलांचे पत्र पुढे करून मुळ मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही फडणवीस म्हणाले.