मुंबई - राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik Minister of Minority Development and Aukaf ) जवळपास एक महिन्यापासून तुरुंगात आहेत. त्यांचे जामीनासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. अशातच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ( Enforcement Directorate ) अटक केलेल्या नवाब मलिक यांच्या जामीनासाठी तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांना फोन करुन तीन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. हे पैसे बिटकॉईन स्वरुपात द्यावे लागतील असेही सांगण्यात आले आहे. यासंबंधी फराज मलिक यांनी अॅड. आमीर मलिक यांच्या सहकार्याने विनोबा भावे पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी (दि. १६) तक्रार दाखल केली आहे.
कोण आहे फोन करणारी व्यक्ती?
नवाब मलिक यांच्या मुलाला इम्तियाज नावाच्या एका अनोळखी व्यक्तीकडून फोन आला होता. त्याने फोन वर म्हटले की, 'साहेबांना जामीन हवा असेल तर तीन कोटी रुपये द्यावे लागतील,' असे फिरोज याने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
कुर्ला येथील जमीन व्यवहारमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नवाब मलिक यांचे दाऊदशी संबध जोडून सुडबुद्धीने ही कारवाई केली असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. अटकेत असलेल्या मलिकांना जामीन मिळवून देण्यासाठी 3 कोटी रुपये जमा करण्याची मागणी इम्तियाजने फोनवर केली असल्याचे फराज मलिक यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे हे पैसे बिटकॉईन स्वरुपात मागण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी वकील आमीर मलिक यांनी विनोबा भावे नगर पोलिसात इम्तियाज नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे.