मुंबई - महापालिका मुख्यालयातील विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या अजित दुखंडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने बुधवारी निधन झाले. महापालिका मुख्यालयातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध पडले. मनपा मुख्यालयातील डॉक्टरने त्यांना तपासून तातडीने रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र, कार्यालयातच बेशुद्ध पडलेल्या दुखंडे यांना एक तास रुग्णवाहिकाच मिळाली नाही, असे काही माध्यमातील बातम्यांवरून स्पष्ट झाले आहे. हा प्रकार संतापजनक असून याप्रकारची तातडीने अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करावी, अशी मागणी आज मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.
या पत्रात मंगलप्रभात लोढा म्हणतात कि, अजित दुखंडे हे केवळ महापालिका कर्मचारी नव्हते तर ते भायखळा भागात एक समाजसेवक म्हणून प्रसिद्ध होते. या कोरोना महामारीच्या काळात त्यांनी अनेक नागरिकांना आणि कोरोनाग्रस्तांना मदत केली होती. अशा व्यक्तीचा अशा पद्धतीने महापालिकेच्या हलगर्जीमुळे मृत्यू व्हावा, हे अत्यंत संतापजनक आहे. त्यामुळे या घटनेची तातडीने अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करणे गरजेचे आहे.
महापालिका मुख्यालयातच घडलेल्या या प्रकाराने काही प्रश्न निर्माण होतात, असे लोढा यांनी म्हटले आहे.
108 क्रमांकावर दूरध्वनी केल्यावर रुग्णवाहिका महापालिका मुख्यालयात पोहोचायला एक तास का लागला?
महापालिका मुख्यालयात स्वतःची रुग्णवाहिका का उपलब्ध नाही? उपलब्ध असेल तर का वापरली गेली नाही?
108 ची रुग्णवाहिका येण्यास वेळ लागला तर खासगी रुग्णवाहिका का मागवली नाही
महापालिका मुख्ययलायतील डॉक्टरांना परिस्थितीचे गांभीर्य कळले नाही का?
एक तास एखादा कर्मचारी मुख्यालयातच बेशुद्ध पडून असतो आणि त्याला वैद्यकीय मदत मिळत नाही, हे कसले आपत्ती व्यवस्थापन आहे?
इतक्या गंभीर रुग्णाला जवळच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सेंट जॉर्ज किंवा जी.टी. रुग्णालयात नेण्याऐवजी तीन ते चार किमी दूर असलेल्या नायर रुग्णालयात नेण्याचा निर्णय का घेतला गेला?
तासभर बेशुद्ध पडलेल्या या कर्मचाऱ्याला जागेवरच वैद्यकीय प्रथमोपचार का मिळाले नाहीत?
मुंबईत हृदयविकाराच्या रुग्णांना तातडीने मदत मिळण्यासाठी "गोल्डन अवर" प्रकल्प सुरू झाला होता, त्याची आजची स्थिती काय आहे?
108 च्या रुग्णवाहिकेसोबत डॉक्टरही असतात, त्यांनी तातडीने काय उपचार दुखंडे यांच्यावर केले?
अजित दुखंडे यांच्या वरिष्ठांनी त्यांचे प्राण वाचविण्यासाठी नक्की काय हालचाली केल्या?
या सर्व गंभीर प्रश्नांची उत्तरे तातडीने शोधली गेली पाहिजेत. कारण महापालिका मुख्यालयातील कर्मचारीच जर वैद्यकीय मदतीअभावी मुख्यालयातच असुरक्षित असतील तर महापालिका सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची कशी हमी देणार? असा प्रश्न लोढा यांनी उपस्थित केला.
या प्रकरणाची चौकशी तातडीने अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवून आठ दिवसात अहवाल सादर करावा, अशी मागणी मुंबई भाजपतर्फे मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.