मुंबई - कोरोनाच्या संसर्गानंतर शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र शाळा सुरु करण्याचा निर्णय कठीण आणि आव्हानात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवारी) केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद -
कोरोनाचे निर्बंध शिथील करून राज्यातील शाळांची प्रत्यक्ष सुरुवात आजपासून करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहात भरलेला असायचा. पूर्वीचे दिवस वेगळे असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे. मात्र शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्रकृतीकडे लक्ष ठेऊन सर्वांनी काम करावे -
मुलं नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. आज आपण मुलांच्या विकासाचे , प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. या विषयावर टास्क फोर्सशी सातत्याने चर्चा करतो आहे. आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. शिक्षकाला बरे वाटत नसेल तर त्याने लगेच चाचणी करून घ्यावी. पावसाळा अजून संपला नाही. साथीचे रोग ही येतात. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष ठेऊन सर्वांनी काम करावे, असे आवाहन मुखयमंत्री यांनी केले.
उघडलेली शाळा परत बंद करायची नाही... -
शाळांच्या खोल्यांची दारे बंद नको, हवा खेळती हवी, निर्जंतुकीकरण करून घ्या. निर्जंतुकीकरण करताना देखील काळजी घ्या. मुलांच्या बसण्यात अंतर ठेवणे, मास्क घालणे, स्वच्छतालयांची स्वच्छता हवी. कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना शुभेच्छा देतो. मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. ती निश्चितपणे पार पडली जाईल असा विश्वास मुख्यंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच एकदा उघडलेली शाळा परत बंद करायची नाही या निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू या, अशा सूचना ही मुख्यमंत्र्यानी केल्या.
हेही वाचा - School Reopen : आजपासून शाळांची घंटा वाजणार; 'अशी' असेल व्यवस्था