मुंबई - मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. वीज बिलापोटी आकारण्यात आलेली जादा रक्कम ग्राहकांना व्याजासह परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम आता थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईत मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प झाले. याचा मोठा आर्थिक फटका मुंबईकरांना बसला होता. त्यातच वीजबिल देखील मोठ्या प्रमाणात आल्याने, आता हे पैसे कसे भरायचे असा प्रश्न नागरिकांना पडला होता. वीजबिल कमी करण्याच्या मागणीसाठी अनेक राजकीय पक्षांकडून आंदोलने देखील करण्यात आली होती. वीज कंपनीने वीज बिलापोटी जादा रक्कम आकारल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या होत्या. त्यामुळे आता वीज बिलापोटी जादा आकारण्यात आलेली रक्कम वीज ग्राहकांना परत करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. ग्राहकांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
व्याजासह रक्कम परत करणार
दरम्यान, जादा आकारण्यात आलेली ही रक्कम वीज ग्राहकांना व्याजासह परत करण्याचा निर्णय बेस्टच्या विद्युत विभागाने घेतला आहे. दरम्यान बेस्टने टाळेबंदीच्या काळात ग्राहकांना दिलेली वीजबिले ही मार्च महिन्याच्या वीजवापरावर आधारित आहेत. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांच्या काळात साधारणपणे विजेचा वापर अधिक होतो. तरीही कोरोनामुळे वीज बिलात २ टक्के सुट देण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.