मुंबई - राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून आणि पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने सुमारे ८२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर तर ७५ जनावरे मृत आढळून आली. जखमींची संख्याही ३८ झाली असून ५९ लोक अद्याप गायब आहेत. मदत व पुनर्वसन विभागाने दुपारी ३ वाजेपर्यंतची आकडेवारी रात्री ८ वाजता जाहीर केली.
![मदत व पुनर्वसन विभागाची आकडेवारी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_24072021212934_2407f_1627142374_685.jpg)
गेल्या २ दिवसांपासून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाने जोरदार तडाखा दिला. कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, ठाणे हे नऊ जिल्हे पाण्याखाली गेले. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून होत्याचे नव्हते झाले. रायगड जिल्ह्यात तीन ठिकाणी दरड कोसळली. लोकांची घरदार, गुरेढोरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. एनडीआरएफ, पोलीस, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक रहिवासी केलेल्या शोध मोहिमेत ४७ लोकांचा तर ३३ जनावर मृत आढळून आले. येथे युद्धपातळीवर अजूनही शोधकार्य सुरू आहे.
![बचावकार्य सुरूच](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_24072021212934_2407f_1627142374_715.jpg)
चिखल आणि संततधार पावसामुळे शोधकार्यत अडचणी येत होत्या. मात्र दुपारनंतर पावसाने थोडी उसंत घेतली होती. घटनेला ४८ तासांचा अवधी उलटून गेल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातारा जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत बारा लोकांचा आणि 33 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली. तर ९० हजार ६०४ लोकांना सुरक्षितस्थळी हलवल्याचे त्यांनी म्हटले आहे.