मुंबई - मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार सुरू आहे. या प्रसारादरम्यान आतापर्यंत्त हजारो रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या प्रत्येक मृताचे डेथ ऑडिट करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेथ ऑडिट कमिटीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक मृत्यूचे डेथ ऑडिट केले जाते, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
१४ हजार ५२२ रुग्णांचा मृत्यू -
मुंबईमध्ये गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू आहे. हा प्रसार जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान कमी झाला. मात्र फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रसार सुरू झाला. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या ६ लाख ९५ हजार ८० रुग्णांची नोंद झाली आहे. मृतांचा आकडा १४ हजार ५२२ वर पोहोचला आहे. तर ६ लाख ४९ हजार ३८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत मार्च एप्रिल दरम्यान रोज ७० ते ८० मृत्यू होत होते. आता यात काही घट झाली असून ५० च्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे.
मृत्यूचे डेथ ऑडिट केले जाते -
कोरोना रुग्णांना हार्ट अॅटॅक, रक्तदाब, श्वसनाचा त्रास, डायबेटीस, किडनी आदी आजार असल्यास त्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अशा रुग्णांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला याबाबत संशय निर्माण केला जात होता. यासाठी राज्य सरकाराच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेने डेथ ऑडिट कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीमध्ये विविध आजारांशी संबंधित असलेल्या डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या कोरोना रुग्णांचा मृत्यू होतो त्याच्या मृत्यूचे डेथ ऑडिट केले जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कसे होते डेथ ऑडिट -
एखाद्याला कोरोना झाला आहे. त्याला इतरही आजार आहेत. अशा रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याबाबतचे मृत्यूची कागदपत्रे डेथ ऑडिट कमिटीसमोर पाठवली जातात. त्याचे डेथ ऑडिट केले जाते. त्या रुग्णाचा मृत्यू होताना तो पॉझिटिव्ह असल्यास त्याची नोंद कोरोना पॉझिटिव्ह मृत्यू म्हणूनच केली जाते, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
८२६ मृत्यूंची नोंद करावी लागली -
मुंबईमध्ये मृत्यू लपवले जात असल्याची तक्रार भाजपचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना मृतांची खरी आकडेवारी समोर आणण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महापालिकेला ८६२ मृत्यूंची नोंद मृतांच्या यादीत करावी लागली होती.