मुंबई - पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता संजय राठोड यांची पाठराखण केली आहे. आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे, ही वस्तुस्थिती आहे. यापूर्वी धनंजय मुंडेंबाबतीत असेच घडले, आरोप झाल्यावर राजीनामा घेतला असता तर त्यांची स्वत:ची बदनामी झाली असती. नंतर आरोप करणाऱ्या व्यक्तीने तक्रार मागे घेतली, असे म्हणत अजित पवार यांनी संजय राठोड यांची पाठराखण केली आहे.
राठोड आमच्या संपर्कात
संजय राठोड हे गायब नसून, ते आमच्या संपर्कात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पूजाच्या वडिलांनीही सांगितले आहे. एकाला ताब्यात घेतलं आहे, अजून एक दोघांना ताब्यात घेतले जात आहे. पोलीस काम करत आहेत. मोठ्या व्यक्तीचे नाव आले की वेगळी प्रसिद्धी मिळत असते, पण आमचा अंदाज आहे, चौकशीनंतरच सत्य समोर येईल, असेही अजित पवार म्हणाले. या प्रकरणात कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचे किंवा पदावरून हटवायचे हे कितपत योग्य आहे, हा विचार करण्याजोगा भाग आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केल आहे. अर्थात ते शिवसेनेचे नेते आहेत. त्याबद्दल शिवसेनाच भूमिका घेईल. माझे स्वत: एक त्रयस्त म्हणून मत आहे. जोपर्यंत चौकशीच्या बाबतीत अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत थोडसं पेशन्स ठेवा. वास्तविक राजकीय क्षेत्रात अशा घटना घडतात तेव्हा चौकशी व्हावी. मुलीच्या वडिलांची देखील प्रतिक्रिया ऐकली आहे. त्या मुलीला पोल्ट्री व्यवसाय टाकायचा होता, असेही ऐकले आहे. याबाबत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे, अजून तपास सुरू आहे. चौकशी झाल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - गुगल भारतामधील लघू उद्योगांना १०९ कोटींची करणार मदत
मी गृहमंत्री नाही
राज्यमंत्री राठोड प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्यासाठी किती काळावधी लागणार, याची प्रसार माध्यमांना घाई आहे. मात्र, मी गृहमंत्री नाही, त्यामुळे मला देखील माहिती नाही, किती दिवस चौकशी चालणार. परंतु, पुण्यातील घटना असल्याने तिकडे जाऊन पोलिसांना सांगेन पत्रकारांना प्रश्नांची उत्तरे हवीत, असा चिमटा अजित पवारांनी काढला आणि एकच हशा यावेळी पिकला.
हेही वाचा - शाळांच्या 'फी' वाढीविरोधात पालकांचे आझाद मैदानात आंदोलन