मुंबई - गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे आज(7 एप्रिल) दीर्घ आजाराने निधन. मुंबईत जे जे हाँस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे वय ७२ वर्ष होते. उद्या(8 एप्रिल) सकाळी वरळी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
हेही वाचा - मुंबईत कोरोनाचा उद्रेक सुरूच; 10 हजार 428 नवे रुग्ण, 23 रुग्णांचा मृत्यू
घरे मिळवून देणारा नेता -
गिरणी संपात वाताहात झाल्यानंतर, लढाऊ गिरणी कामगारही हतप्रभ झाला होता. पण त्यांच्यात पुन्हा लढण्याची इर्षा निर्माण करण्याचे काम दत्ता इस्वलकरांनी केले. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भायखळ्याच्या न्यू ग्रेट मिलसमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाने गिरणी कामगारांच्या लढ्यात पुन्हा प्राण फुंकण्याचे काम केले. याची अंतिम परिणिती गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जमिनीवर घरे देण्याच्या निर्णयात झाली. बंद पडलेल्या उद्योगातील कामगारांना त्याच उद्योगाच्या जमिनीवर घरे देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. गिरणी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले, तसेच त्यांना आणि वारसांना हक्काची मुंबईत घरे मिळवून दिली. जवळपास दहा हजार कामगारांना घरे मिळाल्याने त्यांची वाताहत थांबली. स्वतः गिरणी कामगार असल्याने इस्वलकर यांना कामगारांची दुःख जवळून माहीत होती. त्यांची थकीत वेतने यासह घरांसाठी इस्वलकर यांनी गेले तीन दशके लढा दिला. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला होता. मागील वर्षी महाविकास आघाडी सरकारकडून गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या घरांची सोडत काढण्यात आली. या सोडतीचे उदघाटन हे दत्ता इस्वलकर यांच्या हस्ते पार पडले होते.
हक्काचा आधार गेला -
गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढणारी गिरण गावातील तोफ आज थंड झाली. त्यांच्या निधनाने गिरणी कामगारांचा हक्काचा आधार गेला, अशी प्रतिक्रिया गिरणी कामगारांमधून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - मुंबईकरांना २४ तास घरपोच मागवता येणार पार्सल.. अनेक घटकांना नाईट कर्फ्यूतून सूट